शहरातील मुकुंदनगर भागात आज, रविवारी रात्री दोन गटांतील चकमकीत ‘अंडा गँग’ने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला, त्याच्या हाताच्या पंजातून गोळी आरपार गेली. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मुकुंदनगर व दर्गादायरा येथील दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. यासंदर्भात भिंगारच्या कँप पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचेच पर्यवसान आजच्या गोळीबारात झाल्याचे समजले.
दर्गादायरा येथील शरीफ नौशाद असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे, त्याला कोठी भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंडा गँग एक नगरसेवकच चालवत आहे. पूर्ववैमनस्यातून दोन्ही गट रात्री साडेआठच्या सुमारास सहारा कॉर्नरजवळ समोरासमोर आले. अंडा गँगमधील काही जणांकडे गावठी कट्टे होते. चकमकीत एकाने गोळीबार केला व शरीफ नौशादच्या हातातून गोळी आरपार गेल्याचे चौकशी करता सांगण्यात आले.
माहिती मिळाल्यानंतर भिंगार कँप पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धावले. घटनेनंतर या भागात मोठा तणाव निर्माण झालेला होता.

Story img Loader