सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने फलटण तालुक्यातील विकास विठोबा कोकरे (वय २५, रा. धनगरवाडा, हिंगणगाव) हे वीज पडून जागीच ठार तर सतीश दशरथ दडस (वय १९, रा. फलटण) हे जखमी झाले आहेत.
या पावसाची नोंद घेत नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एकूण ३६ वाडय़ावस्त्यांना गारपिटीचा दणका बसला आहे. तर कायम दुष्काळी समजल्या जाणा-या माण तालुक्यातील २८ गावांना याचा फटका बसला आहे. खंडाळा ४, फलटणमधील ६ वाडय़ावस्त्यांना पावसामुळे आíथक नुकसानीची झळ पोचली आहे. हरभरा, गहू, ज्वारी, मका ही पिके हातची गेली असून माण, खटाव व फलटण येथील डाळिंबाचेही नुकसान झाले आहे. सातारा शहरातही सुमारे दीड तास विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांसह पाऊस पडत होता.
दरम्यान, नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करावेत आणि यात नुकसान झालेल्यांना मदत करण्याचा शासनाने प्रयत्न करावा, असे निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र चोरगे यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहे.

Story img Loader