राज्यातील दुष्काळाचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी १ लाख बंधारे बांधण्यासह अन्य उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाकडे ३५ हजार कोटी रूपये निधी मिळावा यासाठीचा प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. तर उर्वरित निधीसाठी जागतिक बँकेची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.    
सांगली जिल्ह्य़ातील एका कार्यक्रमासाठी जाण्याकरीता मुख्यमंत्री चव्हाण यांचे येथील विमानतळावर आगमन झाले. अल्पकाळ कोल्हापूरच्या दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संपर्क साधला. दुष्काळ निवारणाच्या मुद्यावर भर देत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यासमोर दुष्काळस्थितीमुळे अनेक समस्या उद्भवल्या. मात्र यापुढे दुष्काळ निवारणावर राज्य शासन भर देणार आहे. राज्याच्या विविध भागात सिमेंट व मातीचे १ लाख बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. यासाठी केंद्र शासनाकडे ३५ हजार कोटी रूपये मिळावेत, या मागणीचा प्रस्ताव दोन महिन्यात पाठविला जाणार आहे. हा खर्च ४० हजार कोटीवर गेला तरी तो करण्याची शासनाची तयारी आहे. याच बरोबर जागतिक बँकेकडूनही या कामाकरीता निधी उपलब्ध केला जाणार आहे.जलसंधारणाची अधिकाधिक कामे गतीने पूर्ण करण्याकरीता शासन लक्ष देणार आहे. तळ्यांचा आकार वाढविणे, त्यातील गाळ काढणे, शेतीला ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करणे आदी कांमे केली जाणार आहेत.    
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी बदलाकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी चालविली आहे. काँग्रेस पक्षानेही यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड केली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील.
करवीर नगरीत आलेल्या मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरच्या टोल आकारणीच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर विचारणा केली असता, याची माहिती घेतो, असे त्रोटक उत्तर देत हा विषय त्यांनी टोलविला. विमानतळावर मुख्यमंत्री चव्हाण यांचे स्वागत करण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील, महापौर प्रतीभा नाईकनवरे, जिल्हाधिकारी राजाराम माने, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आदी उपस्थित होते.

Story img Loader