परभणी : भविष्यात मराठवाड्याला पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील असून नाशिक भागात पश्चिमेकडे पडणारे पावसाचे पाणी वाहून समुद्राला जाते, ते वळवून मराठवाड्यात आणले जाईल. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची योजना प्रगतीपथावर आहे, असे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील महात्मा फुले विद्यालय मैदानावर शुक्रवारी पवार यांची जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी माजीमंत्री नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, आ. राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आदींची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, येत्या ३ मार्च रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून यात दि. १० मार्चला अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. विरोधक लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. परंतु लाडक्या बहिणींसह गरिबांच्या हिताच्या कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत.

केंद्रातील सत्तेचा महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोग करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजू समाज घटकांसाठी असंख्य योजना राबवत आहेत. कोट्यवधी लोकांना घरकुल देण्यात आले. तरुणांना रोजगार देणार्‍या अनेक योजना आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार काम करत आहे. गेल्या काही महिन्यांत मराठवाड्यात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. हे वातावरण लवकरात लवकर निवळले पाहिजे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगारांना कुणीही पाठीशी घालता कामा नये, कारण गुन्हेगार हा कायदा, नियम, संविधानापेक्षा मोठा नसतो, असेही ते म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना यशस्वीपणे सामोरे जा, पक्षाचा झेंडा फडकवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. परभणी महानगरांतर्गत भूमीगत गटार योजना पूर्णतः रखडली आहे. आजच आपण वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर चर्चा करीत या योजनेंतर्गत अडथळे दूर करण्यासंदर्भात मुंबईत स्वतंत्र बैठक घेवू व योजना मार्गी लावू, महानगरांतर्गत रस्त्यांची अवस्था निश्‍चितच बिकट आहे, रस्ते कामाकरीता निधी दिला जाईल, तसेच समांतर पाणी पुरवठा योजनाही मार्गी लावू, अशी ग्वाही पवार यांनी दिली. यावेळी वेगवेगळ्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी अजीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.