वनहक्क कायद्याच्या अमलबजावणीमुळे वनसंपदेवर कुऱ्हाड
जागतिक पर्यावरण दिन विशेष
वनजमिनी संपादित करून त्यावर विकासप्रकल्प उभारण्यात येत असल्याची ओरड होत असतानाच वनहक्क कायद्यांतर्गत(२००६) गेल्या सहा वर्षांत तब्बल एक लाख हेक्टर वनजमीन वैयक्तिक कृषीपट्टय़ासाठी आंदण दिली गेल्याचे उघड होत आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वनजमिनींवर ‘नांगर’ फिरवला गेल्याने महाराष्ट्रातील वनाच्छादित क्षेत्राचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास झाल्याने भविष्यात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहेत. विकास प्रकल्पांसाठी अधिग्रहीत होणाऱ्या वनजमिनीपेक्षा १४ पट अधिक वनजमीन वैयक्तिक कृषीपट्टय़ांना दिली गेली असली तरी, त्यातील फायदे नगण्य आहेत.
वन खात्याच्या आकडेवारीनुसारवनहक्क कायदा २००६ अंतर्गत २००६ ते २०१३ या काळात कृषी कामांसाठी वैयक्तिक कृषी पट्टा म्हणून महाराष्ट्रात तब्बल २४३ हजार एकर (९३,४६७ हेक्टर) वनजमिनीचे वाटप करण्यात आले आहे. याउलट, विकास (मूलभूत) प्रकल्पांसाठी वन संवर्धन कायदा १९८० अन्वये वन जमीन अधिग्रहित करण्याच्या हेतूने पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा विचार करता २००५ ते २०११ या कालखंडात जवळजवळ ६६२७ हेक्टर वनजमीन अधिग्रहित करण्यात आली. गेल्या सहा वर्षांत वैयक्तिक कृषी पट्टय़ाच्या नावाखाली विकास प्रकल्पांसाठीच्या वनजमिनींपेक्षा १४ पट अधिक वनजमीन अधिग्रहित झाल्याचे दिसून येते.

अतिक्रमणांना कायद्याचाच आधार?
डिसेंबर २००५ पूर्वी वन जमिनींवर झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या अतिक्रमणांना सरकारने मान्यता दिली आहे. यासंदर्भातील दावे वनहक्क कायद्यांतर्गत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या मार्फत तडजोडींनी मिटविण्यात किंवा फेटाळण्यात आले आहेत. तरीही वन जमिनींवर २००५ नंतर झालेली अतिक्रमणे त्यापूर्वीची असल्याचे सांगून बोगस दावे केले जात आहेत. परिणामी हजारो हेक्टर वनजमिन धोक्यात आली असून वन्यजीवांचे अस्तित्व आणि झाडांच्या कत्तलीचा भीषण प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वनहक्क कायद्यांतर्गत वन जमिनींचे कृषीसाठी होणारे वाटप तातडीने थांबवावे, अशी मागणी  राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी व्यक्त केली.
विकासप्रकल्पांच्या नावाने मात्र बोंब
रेल्वे आणि रस्ते बांधणी प्रकल्प आता काळाची गरज झाल्याने दरवर्षी हजारो हेक्टर वन जमिनींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीकडे येऊ लागले आहेत. या प्रकल्पांची निकड लक्षात घेता त्याला मंजुरी दिली जात आहे. वनक्षेत्रात सिंचन, ऊर्जा आणि खाण प्रकल्पांचेही प्रस्ताव मोठय़ा प्रमाणात प्रलंबित आहेत. सिंचनापासून शेतक ऱ्यांना फायदा होत आहे तर औद्योगिक, खाण आणि ऊर्जा प्रकल्पांमुळे बेरोजगारांना नोकरी मिळण्यापासून तर ऊर्जा निर्मितीची गरज भागविण्यापर्यंत फायदा आहे. मात्र, विकासप्रकल्पांना वनजमिनी देण्याच्या विरोधात बोंब केली जात असताना वैयक्तिक शेतीसाठी शेतकऱ्यांना जमिनी देण्यावर मात्र मौन बाळगले जात आहे. तसेच वन जमिनीवर शेती करताना शेतक ऱ्याला वैयक्तिक किती आर्थिक फायदा होतो, असा सवालही विचारण्यात येत आहे.

विकासप्रकल्पांसाठी अधिग्रहण   
     वर्ष    प्रस्ताव    अधिग्रहण
२००६-०७    ५०    २४२ हे.
२००७-०८    ६०    २२७१ हे.
२००८-०९    ४४    ७५४ हे.
२००९-१०    ४८    १९५६ हे.
२०१०-११    ५८    १०५१ हे.