अलिबाग – खड्ड्यात गेलेल्या मुंबई गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पहाणी करण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल तर डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात काम करता यावे यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम १२ वर्षे रखडले आहे. सुरुवातीला डांबरीकरणाच्या माध्यमातून हा रस्ता केला जाणार होता. मात्र आता काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा निर्णय महामार्ग प्रधिकरणाने घेतला आहे. पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर अशा दोन टप्प्यांत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. यातील पळस्पे ते कासू टप्प्यातील १२ किलोमीटरच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी उर्वरीत काम पूर्ण केले जाणार आहे. कासू ते इंदापूर मार्गाचे काम तांत्रिक कारणामुळे रखडले होते. मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यात हे काम केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यासाठी दोन मशिन्स उद्या दाखल होत असून गरज पडल्यास अजून मशिन्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Video : “तुमच्यासारख्या भिकाऱ्यांच्या….”; टोमॅटो दरावरून सदाभाऊ खोतांची सुनील शेट्टीवर बोचरी टीका

कुठल्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी पळस्पे ते इंदापूर पर्यंत एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल, त्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचे काम डिसेंबर २३ अखेर पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कामात अनेक अडचणी आहेत. पण भूसंपादनाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. ठेकेदारांचे आणि बँकांचेही काही प्रश्न आहेत तेही सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्व अडचणींवर मात करून या महामार्गाचे काम आम्ही पूर्ण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुसळधार पावसात महामार्गाची पहाणी

रविंद्र चव्हाण यांनी पनवेल येथून सकाळी आठ वाजता महामार्गाच्या कामाची पहाणी सुरु केली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कत्रांटदारांचे प्रतिनिधी त्यांच्या समवेत उपस्थित होते. संततधार पावसामुळे पहाणी दौऱ्यात अडचणी येत होत्या. मात्र तरीही खारपाडा, पेण, नागोठणे, वाकण, इंदापूर येथे त्यांनी महामार्गाची थांबून पहाणी केली. यानंतर माणगाव येथे महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यानंतर पुढील महामार्गाची पहाणी करण्यासाठी ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले.

हेही वाचा – राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेल्या नोटीशीचा अर्थ काय?, वकील सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले?

खड्डे भरण्यापेक्षा रस्त्याच्या कामावर भर…

या रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामात पैशाची नासाडी होत आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही रस्त्याची परिस्थिती सुधारत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता खड्डे भरण्यापेक्षा रस्त्याच्या कामावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. मशिनच्या साह्याने रस्त्याचा बेस काढून त्यावर नविन कॉंक्रीट बेस टाकण्याचे काम केले जाणार आहे. कशेडी बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. पाऊस असतानाही त्याचे आवरण टाकण्याचे काम सुरू आहे. हे कामही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One lane of mumbai goa highway planned to be completed before ganesh utsav while both lanes are planned to be completed before december says minister ravindra chavan ssb
Show comments