घाबरून गेलेल्या बिबटय़ाने मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे शुक्रवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात पोपट महादू शेलार (वय ५५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोमाटणे फाटय़ावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली.
तिथे ओढय़ावरील मोरीमध्ये बिबटय़ा बसला होता. त्याला सकाळी एका तरुणाने पाहिले व त्याबाबत इतरांना माहिती दिली. बिबटय़ाला पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली. त्यामुळे बिबटय़ा घाबरला. त्याने उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्यातच त्याने पोपट शेलार यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी शेजारी थांबलेल्या साईनाथ सुरेश शेलार (वय २५ रा. शेलारवाडी) याने हातात असलेल्या दांडक्याने बिबटय़ाला मारले. मग शेलार यांच्यावरील हल्ला थांबवून बिबटय़ा पुन्हा दडून बसला.
पोपट शेलार यांच्या उजव्या खांद्यास व हातास जखमा झाल्या आहेत. बिबटय़ा कुठून, कसा व केव्हा याठिकाणी आला आहे, याची माहिती समजू शकली नाही. तो जवळच्या वनक्षेत्रातून आला असल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बिबटय़ाबाबत माहिती समजताच तळेगाव पोलीस व वडगाव मावळ वनक्षेत्राचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस निरीक्षक संजय निकम तसेच, वडगाव मावळ वनक्षेत्र अधिकारी एस. के. पाटील यांच्यासह पोलीस व वन विभागाचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माणिकडोह बिबटय़ा केंद्राचे प्रमुख डॉ. अजय देशमुख, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी महेंद्र ढोरे हे वन अधिकारीसुद्धा बिबटय़ास सुरक्षित पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा