रायगड लोकसभा मतदारसंघातून या वेळी दोन सुनील तटकरे निवडणूक रिंगणात असणार आहेत. तेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून.. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? पण ही वस्तुस्थिती आहे. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची निवडणुकीत कोंडी करण्यासाठी शेकापने ही खेळी खेळली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या दिवशी दाखल झालेल्या एका नामनिर्देशनपत्राने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुनील शाम तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.  श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी वावे गावातील सुनील शाम तटकरे यांचा मुंबईतील खार पूर्व भागात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीत ते रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामक राजकीय पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जलसंपदामंत्री सुनील दत्तात्रय तटकरे यांनी एनसीपीकडून याच मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची कोंडी करण्यासाठी शेकापने ही खेळी केली आहे. तटकरे यांच्या नावाशी आणि त्यांच्या पक्षाच्या नावाशी साधम्र्य असणारा उमेदवार शेकापने शोधून काढला आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी अलिबाग येथील आरडीसीसी बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील शाम तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामक राजकीय पक्षांची सहा महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष कमलेश कुमार असून या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून चार उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यात मुंबई, ठाणे, कल्याण आणि रायगड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघांत पक्षाकडून उमेदवार उभे केले जाणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते गोपाल सहा यांनी या वेळी सांगितले.  तर मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे सुनील शाम तटकरे यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader