राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांच्या (रेडी-रेकनर) मुद्रांक शुल्कात वाढ झाली असली, तरी ती राज्यातील मालमत्ता बाजारातील मंदीचे सावट दर्शवणारीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच विभागांमध्ये ही वाढ २० टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई या शहरांमध्ये एकाही विभागात अशी वाढ झालेली नाही, तर मुंबई शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी ठिकाणी अशी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांमधील मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची संख्यासुद्धा सातत्याने घटल्याचेच आकडेवारीवरून पाहायला मिळाली आहे. तशात राज्यातील व्यावसायिक आणि निवासी प्रकल्पांत १६८० कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने त्यांच्या लिलावाची तयारी सुरू झाली आहे. अशा वेळी या २० टक्के वाढीचा तरी आधार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील सर्व शहरे व जिल्हय़ांमधील रेडी रेकनरचे दर नुकतेच जाहीर झाले. त्याद्वारे विविध विभागांतील मालमत्तांची सरकारी किंमत जाहीर झाली. बहुतांश ठिकाणी या दरात वाढ झाली आहे, पण या वाढीचा दर बोलका आहे. त्याने सध्याच्या मंदीलाच पुष्टी दिली आहे. राज्य मुद्रांक शुल्क महानिरीक्षक कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी विभागांमध्ये रेडी रेकनरचे दर २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दराने वाढले आहेत. मुंबईत मालमत्तांचे एकूण ७३७ मूल्य विभाग आहेत. त्यापैकी केवळ २६ विभागांमधील रेडी रेकनरच्या दराची वाढ २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी तब्बल १३६ विभागांमध्ये अशी वाढ झाली होती. हीच स्थिती कल्याण-डोंबिवली शहरात आहे. तिथे १२५ पैकी केवळ दोन विभागांमध्ये रेडी रेकनरच्या दरात २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या वर्षी तिथे १४ विभागांमध्ये अशी वाढ होती.
पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये एकाही विभागात रेडी रेकनरच्या दरात २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी या शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा