साधू-महंतांमधील वाद, पोलीस बंदोबस्ताचा अतिरेक, प्रशासनाचा गर्दीसंदर्भात फसलेला अंदाज, भाविकांची झालेली पायपीट आणि नियोजनाच्या मुद्दय़ावरील राजकारण.. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून गणल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील शनिवारच्या पहिल्या शाही पर्वणीची ही ठळक वैशिष्टय़े ठरली. रक्षाबंधन व जन्माष्टमीच्या तयारीमुळे भाविकांची संख्या लक्षणीय कमी झाल्याचे प्रशासनाने मान्य केले. त्र्यंबकेश्वर येथे चक्कर येऊन पडल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला, तर नाशिक येथे गोदापात्रात बुडालेल्या तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
शाही पर्वणीच्या दिवशी स्नानाचा योग साधण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येण्याचा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता. परंतु नाशिक येथे प्रत्यक्षात केवळ तीन लाख, तर त्र्यंबकेश्वर येथे त्याहून कमी भाविक आल्याचे सांगितले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे तलकाशी प्रसाद (६०, मुंबई) यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. नाशिक येथे रामकुंडात दुपारी स्नान करताना बुडालेल्या युवकाला बाहेर काढण्यात आले. अतुल पाटील (१७, म्हसरूळ) असे त्याचे नाव असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक झाले. तसेच त्याबद्दल संतप्त भावनाही व्यक्त झाल्या. स्थानिकांच्या अडवणुकीविषयी त्र्यंबकेश्वरवासीयांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर महाजन यांनी त्र्यंबकला धाव घेऊन बंदोबस्ताच्या नावाखाली स्थानिकांची अडवणूक करू नका, मिरवणूक पाहण्यास त्यांना मज्जाव करू नका, अशा सूचना दिल्या. नाशिककरांनाही शाही मिरवणूक पाहण्याची संधी मिळाली नाही. या मार्गावर ठिकठिकाणी भक्कम तटबंदी उभारून त्यांना रोखण्यात आले. यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस यंत्रणेवर टीकास्त्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा