सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र जोरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात नाल्यामध्ये वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसरीकडे ग्रामीण भागात ज्वारीसह मका, गहू, द्राक्षे व अन्य पिकांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे.
शहरात झालेल्या धुवाधार पावसामुळे कुंभार वेस भागातील नाल्यात सलाम साबीर दलाल (वय ३५, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) हा तरुण वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडला आहे. पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाचा जोर वाढला असताना दलाल हा दुचाकीवरून जात होता. याच वेळी त्याची दुचाकी दुचाकी घसरल्याने तो कोसळत पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत सलाम दलाल यास तीन मुले असून ती अनाथ झाली आहेत. मुंबईत झालेल्या २६/११च्या दिवशी दहशतवादी हल्ल्यात त्याचे वडील साबीर दलाल हे छत्रपतीशिवाजी महाराज टर्मिनसवर दहशतवाद्यांची गोळी लागल्याने जखमी झाले होते. या घटनेस दोनच दिवसांपूर्वी १४ वर्षे पूर्ण झाली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचाही अवकाळी पावसाने बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>>
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान असताना अखेर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला असताना त्या पाठोपाठ रब्बी हंगामातही पावसाने साथ न दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. ज्वारी, गहू आदी पिकांना मात्र पोषक वातावरण दिसत असताना आजच्या पावसाने ज्वारी, गहू, मका, हरभरा, द्राक्षे, कांदा आदी पिकांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. यातच वादळी वाऱ्याची भर पडल्याने शेतकऱ्यांपुढील संकट अधिक गहिरे झाले आहे. ज्वारीचे कोठार मानल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात हेच चित्र दिसून आल्यामुळे तेथील शेतकरी धास्तावला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरात अवकाळी पावसाचा फटका बसला. सांगोला-३१, अक्कलकोट-२८.२, माढा-२७.४, करमाळा-२५.४, उत्तर सोलापूर-२४.५, माळशिरस-२३.६, मोहोळ-२३.१, बार्शी-२३, पंढरपूर-२०.३, मंगळवेढा-१७.७ आणि दक्षिण सोलापूर-१२.८ याप्रमाणे एकूण सरासरी २५ मिलीमीटर अवकाळी पावसाची आकडेवारी आहे.
कांदा भिजला
सोलापुरात मंगळवारी संध्याकाळी सातनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरा पावसाने जोर धरला होता. या पावसाचा जोरदार तडाखा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला असून, त्यात मोठय़ा प्रमाणात कांदा भिजला आहे. आधीच कांद्याची आवक वाढल्याने कांदा दर कोसळले आहेत. त्यातच कांदा पावसात भिजल्याने दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.