सांगली : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास निघालेल्या कार्यकर्त्यांच्या मोटारीला कवठेमहांकाळ तालुक्यात अपघात होऊन एक जण ठार तर चौघे जखमी झाले आहेत. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आज पहाटे दसरा मेळाव्यासाठी तवेरा मोटारीतून मुंंबईला निघाले होते. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दूध वाहतूक करणार्या टँकरने या तवेरा मोटारीला मागून धडक दिली. यामध्ये विवेक सुरेश तेली (वय ४२, रा. विद्यानगर कवठेमहांकाळ) हे जागीच ठार झाले. तर महेश शिवाजी सुर्यवंशी (वय ३०, रा. कवठेमहांकाळ), संदीप शिंंत्रे (वय ४०) आणि सुभाष कुनूरे (वय ५५ दोघेही रा. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ) प्रसाद सुर्यवंशी हे चार जण जखमी झाले. या सर्वांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांचा आता धनगर आरक्षणालाही पाठिंबा; म्हणाले, “आपल्या दोघांचं दुःख…”
टँकरने धडक दिल्यानंतर तवेरा मोटारीचा मागील भाग पूर्णपणे चेपला गेला. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.