रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी दुपारी दुचाकीचा स्फोट होवून एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला. निकेश पाटील असे जखमी पोलिसाचे नाव असून, त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.
निकेश पाटील हा श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सध्या तो प्रशिक्षणासाठी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आला होता. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या आवारात उभी असलेली मोटारसायकल निकेश सुरू करत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात निकेश पाटील हा गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, अधिक उपचारांसाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. स्फोटात मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे.
हा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या जागेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलिसांचा शस्त्रसाठा आहे. त्यामुळे पोलीस याकडे गांभीर्याने पाहात आहेत. पोलीसांकडून श्‍वानपथक तसेच मेटल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी करण्यात आली आहे.

Story img Loader