परळी येथील औष्णिक वीज केंद्रातील संच कोळशा अभावी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. परळी येथे २५० मेगावॅटचे तीन संच उपलब्ध असून त्यासाठी दररोज १० ते ११ टन कोळसा लागतो. प्रत्येक संचासाठी ३५०० ते चार हजार टन कोळसा लागतो. तो उपलब्ध नसल्याने एक संच सोमवारी बंद करण्यात आला. दोन दिवसात कोळसा पुरवठा सुरळीत झाल्यास हा संच पुन्हा सुरू केला जाईल असे औष्णिक वीज केंद्राचे अधीक्षक अभियंता मोहन आवाड यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून कोळशाचा अपुरा पुरवठा सुरू आहे. तीन पैकी दोन संचास पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे आठ क्रमांकाचा संच बंद ठेवण्यात आला आहे. परळी येथील औष्णिक वीज केंद्रास पुरविण्यात येणाऱ्या कोळशाचा उष्मांक प्रति किलो ३४०० एवढी आहे. कोळशा ऐवजी बांबूसह पाचटापासूनचे इंधन वापरण्या बाबतही निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

कोळसा नसल्याने संच बंद ठेवण्याची वेळ महानिर्मिती कंपनीवर आली आहे. राज्यात एखादे वीज केंद बंद पडले तर भारनियमन करावे लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader