* अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
* रुग्णांच्या डॉक्टरांकडील फेऱ्या वाढण्याची चिन्हे
औषधविक्रीच्या दुकानांतून कोणत्याही चिठ्ठीशिवाय अथवा जुन्याच चिठ्ठीच्या आधारे दिलेल्या औषधांच्या वापरामुळे होणारा विपरीत परिणाम रोखण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. त्यानुसार, डॉक्टरच्या एका चिठ्ठीवर (प्रीस्क्रिप्शन) रुग्णांना केवळ एकदाच औषध घेता येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी एफडीएमार्फत राज्यभर मोहीम राबवण्यात येत असून जुन्याच चिठ्ठीवर औषधे देणाऱ्या केमिस्टांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ‘एफडीए’च्या या निर्णयामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतल्याने होणारा धोका टळणार असला तरी रुग्णांच्या डॉक्टरांकडील फेऱ्या वाढण्याची दाट शक्यता आहे.
अनेकदा किरकोळ आजार झाल्यास त्या आजारासाठी पूर्वी कधी तरी डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवरील औषधांचेच सेवन केले जाते. मात्र, याचा रुग्णाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचीही भीती असते. त्यामुळे तापासारखे संसर्गजन्य आजार व इतर काही आजारांसाठी डॉक्टरांनी दिलेल्या एका चिठ्ठीवर (प्रीस्क्रिप्शन) रुग्णाला एकदाच औषध द्यावे, असे आदेश एफडीएने काढले आहेत. ‘रक्तदाबासारख्या निवडक आजारांवरील औषधे एकाच चिठ्ठीवर (प्रीस्किप्शनवर) एकाहून अधिक वेळा देता येणे शक्य आहे. त्यासाठी डॉक्टर चिठ्ठीवर तसे लिहू शकतील. मात्र, ताप किंवा इतर संक्रमणात्मक आजारांवरील औषधे एका चिठ्ठीवर एकदाच मिळतील. अशा वेळी त्या चिठ्ठीचा पुन्हा औषधे घेण्यासाठी उपयोग होऊ नये यासाठी औषध विक्रेत्यांनी या चिठ्ठीवर शिक्का उमटवावा लागेल,’ असे औषध विभागाचे सहआयुक्त बा. रे. मासळ यांनी सांगितले. जी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता येत नाहीत अशी औषधे एखाद्या रुग्णाला नियमितपणे घ्यावी लागत असतील, तर डॉक्टरांनी चिठ्ठीवर तसा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या उल्लेखासह रुग्ण विशिष्ट औषधे एकाच चिठ्ठीवर पुन्हा घेऊ शकतील, असेही मासळ यांनी स्पष्ट केले.
अनेकदा ग्राहकच चिठ्ठी पुन्हा वापरता यावी यासाठी त्यावर शिक्का न मारण्याचा आग्रह औषध विक्रेत्यांकडे धरतात. अशा वेळी गिऱ्हाईक दुसरीकडे जाऊ नये, अशी भीती विक्रेत्यांना असते. अशा अडचणी लक्षात घेऊन या मोहिमेला विरोध होऊ नये यासाठी एफडीएचे प्रभाग निरीक्षक औषध विक्रेत्यांच्या बैठका घेऊन त्यांना मोहिमेसंबंधी सूचना देत आहेत. गेले पंधरा दिवस ही जागृती मोहीम सुरू आहे, असे मासळ यांनी सांगितले.