आठवडय़ातील एक दिवस ‘नो वॉटर डे’ची संकल्पना शहरवासीयांना अडचणीची ठरल्याची दखल घेत मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेत महापौर अॅड. यतिन वाघ यांनी पाणीकपातीच्या वेळापत्रकाचे फेरनियोजन केले आहे. त्यानुसार ज्या भागात दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो, त्या भागात आता एक वेळ तर ज्या भागात केवळ एकच वेळ पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी १५ ते २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे, दोन वेळा पाणीपुरवठा होणाऱ्या भागात आता दररोज एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
पावसाळा लांबल्यास शहराला गंभीर टंचाईच्या स्थितीला सामोरे जावे लागू नये, याकरिता महापालिकेने साधारणत: दीड महिन्यांपूर्वी पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दररोज १० टक्के पाणीकपात आणि आठवडयातील एक दिवस म्हणजे मंगळवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाण्याची बचत करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे बरे-वाईट परिणाम अल्पावधीतच दिसू लागले. एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा अथवा पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांच्या रोष खुद्द उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह नगरसेवकांनाही सहन करावा लागत होता. या पाश्र्वभूमीवर, महापौरांनी पाणीकपातीच्या वेळापत्रकाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापौर. अॅड. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी पाणीकपातीच्या अन्य पर्यायांयावर विचारविनिमय करण्यात आला. चर्चेअंती अखेर मंगळवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्याऐवजी आता ज्या भागात दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करणे तसेच नवीन नाशिक व सातपूरच्या ज्या भागात दिवसातून केवळ एक वेळ पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी १५ ते २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार असल्याचे महापौर वाघ यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा