दुष्काळाचे सावट असताना विघ्नहर्ता गणरायाचे पंढरपुरात मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. शहर व तालुक्यामध्ये सुमारे साडेतीनशे मंडळांत सार्वजनिक गणपती तसेच घरगुती गणपती विराजमान झाले. १५ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे. दरम्यान,श्री गणरायाच्या आगमना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यास कन्हेरी फुलांनी सजविण्यात आले आहे. लाल रंगांच्या फुलांच्या सजावटीमुळे सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले.
पंढरपूर शहर व तालुक्यासह गावचावडीवर मोठय़ा प्रमाणावर गणेशभक्त कार्यकर्ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.पावसाने जरी समाधानकारक हजेरी लावली नसली तरी ग्रामीण भागासह शहरात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.पंढरपूर शहरामध्ये सुमारे १५० गणेश मंडळ हे नोंदणीकृत आहेत. तर सुमारे दोनशेहून अधिक बालमित्र मंडळीदेखील शहरांमध्ये कार्यरत असतात. तर पंढरपुर तालुक्यामध्ये साधारणपणे १५० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे नोंदणीकृत आहेत.यापैकी १५ गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे.ठिकठिकाणी पोलिसांचा जागता पहारा आणि बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरामध्ये आज सकाळी नऊ वाजता पारंपरिक पद्धतीने गणेशाची स्थापना मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आली.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास मंदिर समितीच्या वतीने कन्हेरी फु लांनी सजविण्यात आले.