लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेले काम बंद आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सुमारे ५० हजार क्विंटल कांदा लिलावाविना तसाच पडून राहिला आहे. उद्या रविवारी बाजार समिती बंद राहणार असल्यामुळे कांद्याचा लिलाव येत्या सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
गेल्या गुरुवारी माथाडी कामगारांनी अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजार समितीमध्ये उतरवून न घेता वाहनांमध्ये तसाच पडून होता. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी कांद्याचा लिलाव होणे अपेक्षित होते. परंतु दुसऱ्या दिवशीही माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरूच होते. एवढेच नव्हे तर तिसऱ्या दिवशी, शनिवारीही कांदा लिलाव ठप्पच होता. सलग तिसऱ्या दिवशीही लिलावाविना कांदा तसाच पडून राहिल्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.
आणखी वाचा-एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
दरम्यान, उद्या रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला साप्ताहिक सुटी असल्यामुळे सलग चौथ्या दिवशीही कांदा लिलाव होणार नाही. तो आता सोमवारीच होणे अपेक्षित आहे. गुरुवारपासून सुमारे ५० हजार क्विंटल कांदा लिलावाविना पडून असल्यामुळे नवीन कांदा बाजार समितीमध्ये आला नाही. त्यामुळे कांद्याचा दर आणखी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.