आवक घटल्याने हमालांचीही कोंडी
कांद्यासाठी राज्यात लासलगावापेक्षा सरस ठरलेल्या सोलापूरच्या कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये नोटाबंदीचा कांदा व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या १ नोव्हेंबरपासून कृषी बाजारात नव्या कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु गतवर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक घटली आहे. त्यामागे नोटाबंदीचे प्रमुख कारण सांगितले जाते.
नोटाबंदीमुळे एकीकडे कांद्याची आवक घटली असताना दुसरीकडे नोटाबंदीचा त्रास व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य शेतकरी व तेथील हमालवर्गाला सहन करावा लागत आहे. कृषी बाजारात दाखल होणाऱ्या कांद्याची जावकही तुलनेत घटल्याचे दिसून येते. त्यामुळे कांदा मोठय़ा प्रमाणात कृषी बाजारात पडून आहे. या बाजारात लाल कांद्याला दर सहाशे ते दीड हजारांपर्यंत, तर पांढऱ्या कांद्याचा दर सातशे ते एकोणीसशे रुपयांपर्यंत मिळत आहे.
मध्यम प्रतीच्या कांद्याला किफायतशीर दर मिळत नसल्याने काही कांदा उत्पादक शेतकरी आपण आणलेल्या कांद्याचा लिलाव करू न देता चांगल्या दराची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना कृषी बाजारात मुक्काम करण्याबरोबर कांद्याच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी लागत आहे.
चालू नोव्हेंबरपासून सोलापूर कृषी बाजारात कांद्याची आवक व्हायला सुरुवात होते. ही आवक जानेवारीपर्यंत चालूच राहते. गेल्या १ नोव्हेंबरपासून ते २१ नोव्हेंबपर्यंत कृषी बाजारात एकूण १६ कोटी ९८ लाख ४१ हजार ३५० रुपये किमतीच्या तीन लाख ८१४८ क्विंटल कांद्याची आवक झाली. मागील वर्षांतील कांद्याच्यावर दृष्टिक्षेप टाकला असता त्यावेळी दुष्काळी परिस्थिती असतानादेखील ही आवक तब्बल एक कोटी ५ लाख १६३३ क्विंटल इतकी झाली होती. तर त्याची किंमत तब्बल १०३ कोटी १५ लाख २० हजार ६०० रुपये इतकी होती. यंदा नोव्हेंबरमध्ये आवक मोठय़ा प्रमाणात घटल्याचे दिसून येते.
सध्याच्या नोटाबंदीमुळे सोलापूर कृषी बाजारात काही दिवस व्यापार बंद ठेवण्यात आला होता. नंतर व्यापाऱ्यांनी धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना शेतीमालाची रक्कम अदा करणे सुरू केले. मात्र सध्या रोखीने होणारे व्यवहार ३० टक्क्य़ांपर्यंतच मर्यादित आहेत. यात व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना तसेच हमालवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून घेतलेले शेतीमालाचे धनादेश वटल्यानंतर पुढे प्रत्यक्षात बँकेतून मर्यादित स्वरूपात रक्कम हाती पडते. त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
बेकारीची कुऱ्हाड
कृषी बाजारात येणाऱ्या शेतीमालाची चढउतार करण्यासाठी हमालांची मदत घ्यावी लागते. मात्र सध्याचा चलनचटका हमालवर्गाला बसला आहे. मुळातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापि तरी कांद्याची आवक घटल्याने हमालांना कमी प्रमाणात काम मिळत आहे. व्यापारीवर्ग आपल्याकडील पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटा खपविण्यासाठी दोन हमालांना मिळून एकत्रित मजुरीची रक्कम देताना त्यात पाचशेची जुनी नोट सक्तीने देतात. नंतर ही पाचशेची नोट व्यवहारात आणताना हमालाला किमान ५० रुपयांचा भरुदड सोसावा लागत असल्याचे गोपाळ लक्ष्मण कांबळे व शंकर सानेपागेलू या हमालांनी सांगितले.