अशोक तुपे
करोनाची दुसरी लाट येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात मोठे चढउतार होत आहेत. शेतकरी कच्चा कांदा बाजारात आणत आहेत. त्याचा परिणाम दर्जावर झाला असून आवक वाढली आहे. मात्र बाजारात मागणी नाही. त्यामुळे कधी दरवाढ तर कधी दर घसरण असे प्रकार वारंवार घडत असून कांदा बाजारपेठ अस्थिर झाली आहे.
यंदा कांद्याची लागवड कमी क्षेत्रात झाली आहे. त्यात एकरी उत्पादन घटणार असल्याची चिन्हे आहेत. खरीप कांद्याचे उत्पादन झाले नाही. त्यामुळे लवकर लावलेला गावरान कांदा बाजारात आला.
सुरुवातीला भाव चाळीस रुपये किलो होते. नंतर हे भाव ३० ते ३५ रुपयांवर आले. जानेवारी व फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चांगले दर होते. पण करोनाची दुसरी लाट येणार अशी चर्चा सुरू झाली. त्याचा परिणाम अचानक बाजारपेठेत झाला. कांदा बाजार अस्थिर झाला. शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. दर अचानक १५ ते १८ रुपये किलो झाले.
करोनामुळे विविध निर्बंध लागू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. मागील वर्षी जनता संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर बाजार समित्याचे कामकाज बंद पडले होते. तसेच कांद्याला मागणी नव्हती. परराज्यात कांदा पाठविता येत नव्हता. त्यामुळे मातीमोल किमतीला कांदा विकण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा करोनाची दुसरी लाट आली तर कांदा दर कोसळतील असे शेतकऱ्यांना वाटू लागले. त्यामुळे शेतात कच्चा कांदा विक्रीला आणण्याची घाई सुरू झाली. बाजार समित्यामधील आवक वाढली. चाळीस रुपयावरून दर थेट पंधराशे ते अठराशे रुपयांवर आले आहे. अन् पुन्हा दर दोन हजार ते अडीच हजारावर गेले. एकूणच भाव खूपच अस्थिर असून हे पहिल्यादा कांदा व्यापारात घडत आहे.
आता मार्च अखेरीला गावरान कांद्याची काढणी सुरू होणार आहे. त्यानंतर आवक वाढेल. सध्या दक्षिण भारतात मागणी चांगली आहे. पण नेहमीच्या तुलनेत मागणी नाही. त्यात पश्चिम बंगालमधील सुखसागर भागातील कांदा पुढील पंधरा दिवसांत सुरू होईल. राजस्थान व मध्य प्रदेशमध्येही कांदा एप्रिलमध्ये निघेल. त्यामुळे दर पंधराशेच्या आत येतील. असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे.
करोनामुळे लग्नसमारंभ, कार्यक्रम बंद आहेत. हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी नाही. त्यामुळे कांद्याला मागणी नाही. कांद्याचा दर्जा चांगला नाही. शेतकरी करोनाच्या भीतीने कच्चा कांदा विक्रीला आणत आहेत. यंदा कांद्याच्या उत्पादनात घट येणार आहे. रब्बी कांदा उत्पादन कमी झाले तरी खरीप लाल कांदा किती क्षेत्रात लावला जातो व उत्पादन किती येते त्यावर भविष्यातील दर असतील. सध्या दर अस्थिर आहेत.
– सुदाम तागड, कांदा व्यापारीं
राज्यात ३.५ लाख हेक्टरवर रब्बी (उन्हाळ) कांदा लागणी होत्या. गेल्या वर्षी ५ लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी होत्या. या गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील उन्हाळ कांद्याखालील क्षेत्र २० टक्क्यांनी कमी आहे. नैसर्गिक प्रतिकूलता आणि निकृष्ट बियाण्यांमुळे सर्वसाधारणपणे गेल्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची प्रतिएकरी उत्पादकता कमी असेल. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत पुरवठय़ाची आणि बाजाराची दिशा काय असेल ते हळूहळू स्पष्ट होतेय. मोठी पुरवठावाढ दिसत नाही. येत्या काळात पुरवठा नियंत्रणाबाबत येत्या दोन महिन्यांतील पाऊसमानाचा मोठा परिणाम असेल. यंदा थंडी कमी होती. त्यामुळे रोगराईचे प्रमाण अधिक आहे. अपवाद वगळता प्रतिएकरी उत्पादकता कमी असेल.
– दीपक चव्हाण, शेतमाल विक्रीचे अभ्यासक