कांदा भावाने हंगामातील नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून लासलगाव बाजार समितीत आदल्या दिवशीच्या तुलनेत गुरुवारी प्रति क्विंटल भावाने सरासरी ७०० रुपयांची उसळी घेत ५२०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. आदल्या दिवशी हा भाव ४५०० रुपये इतका होता. किरकोळ बाजारात कांदा ५२ रुपये प्रति किलो झाला आहे.
राज्यातील उन्हाळ कांदा संपुष्टात येताना दरवर्षी कर्नाटकातील नवीन कांदा बाजारात येतो. यंदा पावसामुळे उपरोक्त भागांतही पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून अपेक्षित कांदा बाजारात आलेला नाही. त्यातच साठविलेला कांदा संपुष्टात येत असून त्याचीही आवक घटली आहे. परिणामी मागणी व पुरवठा यांच्यात कमालीची तफावत निर्माण होऊन दिवसेंदिवस भाव उच्चांकी पातळी गाठत आहेत. पुढील काही दिवस हे चित्र कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
या वर्षी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे कांदा अतिशय कमी प्रमाणात शिल्लक आहे. त्यातून पुढील वर्षांसाठी कांद्याचे बियाणे किती तयार होईल याबद्दल शेतकऱ्यांना धास्ती आहे. अपेक्षित बियाणे तयार न झाल्यास पुढील वर्षांचे नियोजन कोलमडणार असल्याची भीती संबंधितांकडून व्यक्त केली जात आहे.
रोपे तयार, पण लागवड नाही..
’ नाशिकसह राज्यातील काही भागांत कांद्याच्या रोपांची नागपंचमीपासून लागवड केली जाते. शेतकऱ्यांकडे रोपे तयार असली तरी पावसाअभावी त्यांची लागवड करता आलेली नाही.
’ सोलापूर, लोणंद भागांतील कांदा ऑगस्टच्या मध्यानंतर बाजारात येतो, पण त्याचे आगमन लांबणीवर पडले आहे.
’ कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने नाफेडने याआधी खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. दररोज २०० ते ३०० क्विंटल टन माल शहरांमध्ये पाठवून दरवाढ रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.