दिल्ली, कोलकाता आणि मुंबईसारख्या महानगरांना कांदापुरवठा करणाऱ्या नाशिक व पुणे जिल्ह्य़ात ‘रांगडा’ कांद्याचे अद्याप उत्पादनच न झाल्याने कांद्याचे भाव अचानक वाढले असून घाऊक बाजारात १८ ते २० रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा कांदा किरकोळ बाजारात चक्क २८ ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. चार दिवसांपूर्वी याच कांद्याचा भाव किरकोळ बाजारात १५ ते १६ रुपये किलो होता.
कारण काय?
राज्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मराठवाडा, विदर्भातील स्थिती नाजूक आहे. या दुष्काळाचा काहीसा परिणाम उत्तर व पश्चिम महाराष्ट्राच्या शेती उत्पादनावरही होऊ लागला आहे. योग्य वेळी न पडलेल्या पावसामुळे या वर्षी कांद्यातील रांगडा कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला कांदापुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ात काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या लाल कांद्याचे उत्पादन आता संपुष्टात आले आहे. याच काळात रांगडा कांद्याचे उत्पादन येणे आवश्यक होते, पण हा कांदा आणखी एक महिना उशिरा बाजारात येण्याची शक्यता नाशिक येथील कांदा उत्पादक व व्यापारी नंदलाल मोतीलाल चोपडा यांनी दिली.
भाववाढीची सद्यस्थिती काय?
तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात गुरुवारी २५० गाडय़ा भरून कांदा आला आहे. ही सरासरी चांगली असली तरी शुक्रवारपासून लागणारी तीन दिवस सुट्टी त्याला जबाबदार आहे. तीन दिवसांच्या सततच्या बाजार बंदमुळे शेतकऱ्यांनी कांदा मोठय़ा प्रमाणात पाठविला आहे. आवक चांगली असताना कांद्याचे भाव अचानक का वाढले आहेत याची कल्पना कांदा व्यापाऱ्यांनादेखील नाही, पण कांद्याचे भाव मात्र वाढल्याचे कांदा बाजार संचालक अशोक वाळुंज यांनी मान्य केले.
किरकोळ बाजारातील वाढ किती?
संधीचे सोने करण्यात पटाईत असणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक बाजारात कांद्याचे भाव वाढल्याचे पाहताच आपल्या भावात थेट दहा रुपयांनी वाढ केली असल्याचे दिसून येते. त्यात कांद्याला महानगरातील हॉटेल्समध्ये मोठी मागणी आहे. तीन दिवसांची सुट्टी लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आली आहे, पण त्यानंतरही ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता नाशिकमधील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.