दुष्काळामुळे उत्पादन कमी मात्र मागणी जास्त अशा व्यस्त प्रमाणाच्या कात्रीत सापडलेल्या कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याचा दर क्विंटलला ३२०६ रुपये झाला. आवक मंदावल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. मुंबई, ठाण्यात किरकोळ बाजारातही सोमवारी कांदा ४२ ते ४५ रुपये किलो दराने विकला जात होता. राज्य सरकारच्या स्वस्त भाजी विक्री केंद्रावरही कांद्याचा दर किलोमागे ४० रुपयेच होता. येत्या महिनाभर तरी या परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे.
नाशिक जिल्ह्य़ात एप्रिल तसेच मे महिन्याच्या मध्यावर निघणारे उन्हाळी कांद्याचे पीक यावेळी घटल्यामुळे दोन आठवडय़ांपासून मुंबई तसेच आसपासच्या परिसराला होणारी कांद्याची आवक मंदावली आहे.
त्यामुळे गेल्या आठवडय़ात वाशीतील घाऊक बाजारात कांद्याचे दर २५ रुपयांपर्यत पोहचले होते. मुंबई परिसरातील दर आटोक्यात रहाण्यासाठी दररोज १०० गाडी कांद्याची आवक आवश्यक असते. मात्र, कांद्याची आवक निम्म्यावर आल्याने बाजारात दर थेट ३२ ते ३५ रुपयांपर्यत पोहोचल्याची माहिती कांदा-बटाटा आडत व्यापारी महासंघाचे चंद्रकांत रामाणे यांनी दिली.
दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याची किमान २००० ते कमाल ३२०६ प्रतिक्विंटल दराने खरेदी झाली. उन्हाळी कांद्याने यंदाच्या हंगामात गाठलेला हा सर्वाधिक भाव. दुष्काळामुळे नेहमीपेक्षा कमी आवक होत असल्याचे लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. त्यातच, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असले तरी हवामानामुळे माल खराबही होत आहे. नवीन लाल कांदा बाजारात येण्यास अद्याप १५ ते २० दिवसांचा अवधी असल्याने शहरी ग्राहकांना थोडय़ा अधिक दराने कांदा खरेदीची मानसिकता ठेवावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion price in mumbai soars to rs 40 per kg