देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर घटल्याचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर वाढण्यात झाला. बुधवारी कमाल २३७९ रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला.  समितीत लाल कांद्याची सुमारे आठ हजार क्विंटल आवक झाली. रुपये १६०० ते २३७९, सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटल कांद्याचे भाव होते. महाराष्ट्रात कमी पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. जे पीक शेतात होते, त्यालाही फटका बसला. परिणामी कांद्याचे दर वाढू लागले आहेत. मागील १५ दिवसांत कांद्याचे दर सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहेत. निर्यातीवर बंदी असल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात अल्प पाऊस आणि उपलब्ध पाणीसाठय़ावर शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले. जवळपास ५० टक्के कांद्याचे उत्पादन झाले. परंतु इतर राज्यांत मात्र तुलनेत उत्पादन अतिशय कमी झाले. त्यामुळे त्या राज्यांमध्ये सध्या कांदा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. शिवाय बाजारपेठेत कांद्याला सध्या मागणी आहे. मागणी अधिक आणि उत्पादन कमी असल्यामुळे सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मनमाड बाजारपेठेत बुधवारी कांद्याचे भाव प्रतिक्विंटल सुमारे ४०० रुपयांनी वाढले.    

Story img Loader