लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत असल्याने त्याचे भाव २७५ रुपये प्रति क्विंटलने घसरले. बाजार समितीत सरासरी १४२५ रुपयांचा भाव मिळत असल्याने त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून बाजारभावात घसरण होत आहे. मागील सप्ताहात लाल कांद्याला प्रति क्विंटलला १६९० रुपये भाव मिळाला होता. त्या तुलनेत चालू सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी लाल कांद्याच्या सरासरी दरात २७५ रुपयांनी घट नोंदविली गेली. या दिवशी प्रति क्विंटलला सरासरी १४२५ रुपये भाव मिळाला. सध्या लासलगाव बाजारात कांद्याची प्रचंड आवक सुरू आहे. सोमवारी तब्बल २० हजार क्विंटलची आवक झाली. पुढील काही दिवस लाल कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. या कांद्याला कोलकाता, आसाम, बिहार, दिल्ली व पंजाब आदी भागातून मागणी आहे. निर्यातीचे प्रमाण नगण्य आहे. कधीकाळी परदेशी बाजारात भारतीय कांद्याला मिळणारी हक्काची बाजारपेठ पाकिस्तान, चीन या देशांनी काबीज केली आहे. केंद्र सरकारच्या निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दबदबा असणाऱ्या भारतीय कांद्याला फटका बसला आहे. सध्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य ३०० डॉलर प्रति टन आहे. परदेशातील स्पर्धात्मक बाजारपेठेत तग धरण्यासाठी निर्यातदारांना हे दर परवडणारे नसल्याने त्यांचा खरेदीत निरुत्साह दिसून येतो. लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांनाही मिळेल त्या भावात तो विकणे भाग पडले आहे. सोमवारी लासलगाव बाजारात समितीत लाल कांद्याला किमान ८०० रुपये, तर कमाल १५६१ रुपये भाव मिळाला.
कांद्याच्या भावात २७५ रुपयांनी घसरण
लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत असल्याने त्याचे भाव २७५ रुपये प्रति क्विंटलने घसरले.
First published on: 30-12-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices fall by rs