परराज्यातीव कांद्याची सुरू झालेली आवक आणि जिल्ह्यात ‘रांगडय़ा’चे वाढलेले उत्पादन यामुळे गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कांद्याच्या दरात प्रति क्विंटलला सुमारे २७८ रूपयांनी घट झाली आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी सरासरी १८७८ रूपये प्रति क्विंटल दराने विकला गेलेला कांदा गुरूवारी १६०० रूपयांपर्यंत खाली घसरला. नाशिकमध्ये ही स्थिती असताना मुंबईत अचानक वाढलेल्या किंमतीमागे मध्यस्तांची असणारी लांबलचक साखळी अन् इंधन दरातील वाढ, ही कारणे असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.गत हंगामाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात रांगडा कांद्याचे उत्पादन वाढले असून त्याची बाजार समितीत आवकही मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. त्यातच, बिहार, पश्चिम बंगाल व राजस्थानमधील कांदाही येऊ लागल्याने त्या भागातून नाशिकच्या कांद्याला असणारी मागणी कमी झाली. या सर्वाचा परिणाम दर घसरण्यात झाला असून आगामी काळात जसजशी आवक वाढेल, तसतसे दर आणखी खाली येतील, असा अंदाज लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. गुरूवारी लासलगाव बाजार समितीत २८ हजार ३६० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास प्रति क्विंटल १६०० रूपये दर मिळाला. या बाजार समितीत चार दिवसांपूर्वी कांद्याची सरासरी १८७८ रूपये प्रती क्विंटल दराने विक्री झाली होती. नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून स्थानिक व्यापारी माल खरेदी करतो. त्यानंतर ते आपला नफा कमावून हा माल मुंबईसह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांना विक्री करतात. ते व्यापारी आपला नफा ठेऊन पुढे किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतात. या किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत अखेर तो ग्राहकांपर्यंत पोहोचतो. या लांबलचक साखळीतून मार्गक्रमण केल्यामुळे दरवाढ होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाशिकमध्ये मात्र दर घसरण
परराज्यातीव कांद्याची सुरू झालेली आवक आणि जिल्ह्यात ‘रांगडय़ा’चे वाढलेले उत्पादन यामुळे गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कांद्याच्या दरात प्रति क्विंटलला सुमारे २७८ रूपयांनी घट झाली आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी सरासरी १८७८ रूपये प्रति क्विंटल दराने विकला गेलेला कांदा गुरूवारी १६०० रूपयांपर्यंत खाली घसरला.
First published on: 25-01-2013 at 03:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices fall down in nashik