किमान निर्यात दरात केंद्र सरकारने केलेली वाढ, कर्नाटकातून लाल कांद्याची सुरू झालेली आवक, चीन व पाकिस्तानचा बाजारपेठेत दाखल होण्याच्या मार्गावर असलेला कांदा, या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन स्थानिक पातळीवर कांद्याचे भाव १२०० ते १५०० रुपयांनी गडगडले. कांद्याची देशातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत आदल्या दिवशीच्या तुलनेत भाव प्रतिक्विंटल १२०० रुपयांनी घसरून ४४०० रुपयांवर आले. कांदा भावातील दोलायमान परिस्थितीमुळे व्यापारी वर्गाने खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.
दोन ते तीन महिन्यांपासून काही अपवाद वगळता कांदा भाव वेगवेगळी उंची गाठताना दिसत होते. सहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडणारा कांदा अवघ्या तीन दिवसांत सुमारे दीड हजार रुपयांनी खाली आला. लासलगावप्रमाणे इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याची अशीच घसरण झाली. नामपूर उपबाजार समितीत ४२०० रुपये सरासरी भाव मिळाला. हे दर कमी होण्यास वेगवेगळी कारणे व्यापारी वर्गाकडून दिली जात आहेत. पावसामुळे लांबणीवर पडलेली नव्या लाल कांद्याची आवक कर्नाटकासह राज्यातील काही निवडक भागातून होऊ लागली आहे. दुसरीकडे भाव उंची गाठू लागल्याने धास्तावलेल्या केंद्र सरकारने त्याची निर्यात रोखण्यासाठी किमान निर्यात दरात २५० डॉलरने वाढ केली. आता हे दर ९०० डॉलरवर गेल्याची माहिती कांदा व्यापारी नितीनकुमार जैन यांनी दिली. भरमसाट दरामुळे निर्यात होणे अवघड आहे. या घडामोडी सुरू असताना चीनमधील ११ कंटेनरमधून ७३५ मेट्रिक टन कांदा भारतात आला आहे. त्याची चव भारतीयांना फारशी आवडत नसली तरी इतक्या मोठय़ा प्रमाणात आलेल्या मालाचा बाजारपेठेवर परिणाम होणेही स्वाभाविक आहे. चीनचा कांदा बाजारपेठेत येण्याच्या मार्गावर असताना पाकिस्तानकडून वाघा सीमारेषामार्गे पंजाबमध्ये कांदा दाखल झाला आहे. या सर्वाचा परिणाम कांदा भाव खाली येण्यात झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
उन्हाळ कांद्याची घटलेली आवक आणि नवीन कांदा येण्यास विलंब या कारणांमुळे काही दिवसांपासून कांद्याचे भाव उंचावले होते. कर्नाटक व महाराष्ट्रातील अहमदनगरसारख्या काही निवडक भागातून लाल कांद्याची आवक सुरू झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात चांगली आवक होण्यास दोन ते तीन आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. तेव्हा दर आणखी खाली घसरतील, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जात आहे. सध्याची स्थिती लक्षात घेऊन व्यापारी माल खरेदी करण्यास फारशी उत्सुकता दाखवीत नाहीत. नामपूर उपबाजार समितीतील व्यापाऱ्यांनी तर रविवार व सोमवार या सुटीच्या दिवसाबरोबर शनिवारी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा