घाऊक बाजारात कांदा भावाने प्रती क्विंटल जवळपास साडे चार हजाराचा टप्पा गाठल्यामुळे किरकोळ बाजारातही तो चांगलाच वधारल्याने खरेदी करताना ग्राहकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी येत आहे. देशाच्या इतर भागातून येणाऱ्या नवीन मालाची आवक निम्म्याने घटली आहे. त्यात नाशिकसह राज्यात कांदा रोप तयार असूनही त्याची लागवड करता आलेली नाही. परिणामी, यंदा नवीन कांद्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याची झळ पुढील काळात ग्राहकांना सोसावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी महानगरांमध्ये भाव वधारल्याने केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून कांद्याचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. पतेतीमुळे मंगळवारी प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले नसले तरी ज्या मनमाड व इतर काही बाजारात लिलाव झाले, त्या ठिकाणीही भावात वाढ झाली. प्रमुख बाजार समित्यांमध्ये भाव सरासरी ४४०० रुपयांपर्यंत पोहोचले. तर, मनमाड बाजारात हा भाव ४२०० रुपयांपर्यंत राहिला. पुढील काळात हे भाव लगेचच कमी होण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. उन्हाळ कांद्याचा साठा संपल्यावर दक्षिणेतून देशातील बाजारात सर्वप्रथम नवीन माल येण्यास सुरूवात होते. यंदा पावसामुळे त्या भागातही कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या भागातील आवक निम्म्याने कमी झाली आहे. नाशिकसह राज्यातील काही भागात कांदा रोपांची नागपंचमीपासून लागवड केली जाते. शेतकऱ्यांची रोपे तयार असली तरी पावसाअभावी त्यांची लागवड करता आलेली नाही. सोलापूर, लोणंद भागातील कांदा ऑगस्टच्या मध्यानंतर बाजारात येऊ लागतो. मात्र, तिथेही वेगळी स्थिती नाही. मागणीनुसार मुबलक आवक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचे मत लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा