कांदा भावातील घसरण अद्याप सुरूच असून सोमवारी हंगामातील सर्वात नीचांकी म्हणजे ११०० रुपये प्रति क्विंटल पातळी गाठल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष उफाळून आला. पिंपळगाव बसवंत येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक अडीच तास रोखून धरली. या मुद्दय़ावरून मंगळवारी आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तर बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी किमान निर्यात मूल्य कमी होईपर्यंत कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्य़ातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोमवारी कांद्याला प्रति क्विंटल ११०० रुपयांच्या आसपास भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून मुंबई-आग्रा महामार्गावर धाव घेत रास्ता रोको केले. त्यामुळे सुमारे अडीच तास वाहतूक खोळंबली होती.