शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले, योग्य भाव देण्याची मागणी
औरंगाबाद : कांदा लिलावामध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांपर्यंत घसरल्याने वैजापूर येथील बाजार समितीमधील लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. बाजार समितीच्या मुख्या प्रवेशव्दारासही कुलूप ठोकल्याने काही काळ गोंधळ उडाला. केवळ २० पैसे किलो दराने कांद्याची विक्री सुरू असतानाच परभणीमध्ये राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीच्या ताफ्याच्या दिशेने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकत आंदोलन केले.
बुधवारी सकाळी वैजापूर बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरूवात झाल्यांनतर आवक वाढली होती. मात्र, दर २० रुपये क्विंटल एवढे खाली असल्याचे सांगण्यात आल्यानंतर शेतकरी चिडले. त्यांनी लिलाव बंद पाडले. योग्य भाव दिल्याशिवाय लिलाव होऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. वैजापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश नाईकवाडी व दौलत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी मुख्य प्रवेशव्दारास कुलूप घालून आंदोलन केले.
खोत यांच्या ताफ्याच्या दिशेने टोमॅटोफेक
शेतकऱ्यांच्या शेतमालास व भाजीपाल्यास सध्या कवडीमोल दर मिळतअसून सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या उपाययोजनाही कागदोपत्री असल्याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यातील वाहनाच्या दिशेने टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी कृषी राज्यमंत्री खोत बुधवारी येथे आले होते.
कांदाप्रश्नी चांदवडला प्रांत कार्यालयाला घेराव
नाशिक:कांद्याला दीड ते दोन हजार रुपये भाव द्यावा, नुकसान भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करावी, आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी हजारो शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन चांदवड येथील प्रांताधिकारी कार्यालयास घेराव घातला.