कांद्याची दरवाढ सुरूच असून आज प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ३०० रुपये दर निघाले. देशभरातील अतिवृष्टीमुळे दरवाढ सुरूच असून कांदा भावाची वाटचाल ५ हजार रुपयांकडे सुरू झाली आहे. त्यामुळे आता मुंबई, पुणे, दिल्ली आदी मोठय़ा शहरात कांदा ६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणार आहे.
नगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी व घोडेगाव येथील बाजार समित्यांच्या आवारात आज कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार २५० रुपये दर निघाले. राहुरी येथे १८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. १०० गोण्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला ४ हजार ३०० रुपये दर निघाला. सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपये दर निघाले. घोडेगाव येथील बाजारात ४ हजार २५० रुपये दर निघाले. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भागात अतिवृष्टी झाल्याने लाल कांदा शेतातच सडला. त्यामुळे दरवाढ सुरू झाली आहे.
यंदा राज्यात गावरान कांद्याचे उत्पादन कमी झाले. लाल कांद्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे लागवडी झाल्या नाहीत. गावरान कांद्याचे रोप टाकायला अजून अनेक भागांत पाणी नाही. त्यामुळे डिसेंबपर्यंत केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप केला नाही तर भाव चढेच राहतील. बाजारात सरकारी हस्तक्षेप झाला नाहीतर कांदा पाच हजारांच्या पुढेही वाटचाल करील असा अंदाज आहे.
सरकारने कांदा आयात करायचा ठरवला तरी त्याचा दर्जा चांगला नसतो. यंदा पाकिस्तानातही काही भागांत अतिवृष्टी झाल्याने तेथील कांदा खराब झाला आहे. चीनचा कांदा काळसर रंगाचा असतो. आतादेखील चीनचा कांदा आयात करायला व्यापारी तयार होणार नाहीत. त्यामुळे नवीन कांदा येईपर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याचे दर टिकून राहतील. त्यात हजार ते दीड हजार रुपये कमी जास्त होऊ शकेल, असाही अंदाज आहे.

Story img Loader