दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी जादा दराने कांदा विक्री करण्यास घातलेली बंदी व कर्नाटकच्या नवीन कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुरू झाल्याने गुरुवारी कांद्याचे भाव प्रतििक्वटल एक ते दीड हजार रुपयांनी घटले
राज्यातील गावरान कांदा दिल्लीला जात होता. तेथील बाजार समितीत ६ हजार रुपये िक्वटलने त्याची विक्री होत होती. पण, मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी गुरुवारी सकाळी प्रमुख व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कांदा ४ हजार रुपये क्विंटलपेक्षा जास्त भावाने विकू नये, असे फर्मान काढले. त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारावर झाला. त्यातच कर्नाटकातील चित्रदुर्ग, हुबळी, बेळगाव, दावणगेरे, म्हैसूर आदी भागांतील लाल कांदा बाजारपेठेत आला. तेथील कांदा पावसाने खराब झाला आहे. त्यामुळे तो बाजारात त्वरित विकणे गरजेचे आहे. राज्यात या कांद्याची मोठी आवक सुरू झाली. तीन ते साडेतीन हजार रुपये दराने हा कांदा विकला जात आहे. नगर जिल्ह्य़ातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागांतील नवीन लाल कांदा बाजारात आला आहे. नगर बाजार समितीत ८० ते १०० गाडी कांदा येत आहे. या कांद्याला २ हजार ते ४ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. जुन्या गावरान कांद्याचे दर टिकून असून ५ हजार ते ५ हजार ५०० या दराने हा कांदा विकला जातो. पण, आता नवीन कांद्यामुळे त्याची जादा दराने खरेदी करायला व्यापारी तयार नाहीत. दोन दिवसांत बाजारपेठेत अचानक झालेल्या या नवीन कांद्याच्या आवकेमुळे गावरान कांद्याच्या दरवाढीला लगाम बसला आहे.
चीन, पाकिस्तान व इजिप्त या देशांतील कांदा मुंबईच्या बाजारपेठेत आला होता. पण, आता कर्नाटक व राज्यातील नवीन कांद्याने त्याला रोखले आहे. आता हा कांदा आयात करून येथील बाजारपेठेत विकणे परवडणारे नाही. थोडाफार कांदा आला आहे, त्याची विक्री लवकर करून व्यापारी मोकळे होतील. हा कांदा दरवाढीवर परिणाम करू शकलेला नाही. कर्नाटकच्या कांद्याने मात्र भाव खाली आणले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा