सोलापूर : कांद्यासाठी सर्वदूर ओळख असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी तब्बल १५०० पेक्षा अधिक गाड्या भरून भरून सुमारे दीड लाख क्विंटल इतका उच्चांकी कांदा दाखल झाला. परंतु अगोदरच दर घसरणीची मालिका कायम असल्यामुळे त्यात आणखी भर पडली. प्रतिक्विंटल अवघ्या ७०० रूपये रूपयांपर्यंत सरासरी दर मिळाल्यामुळे कांदा उत्पादक हताश झाले. कांद्याच्या जोडीला कोथिंबिरीला कवडीमोल दर मिळाला. त्यामुळे संतापलेल्या शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेली कोथिंबीर गाडीतून रस्त्यावर फेकून देण्याचेही प्रकार पाहायला मिळाले.
सुरूवातीला प्रतिक्विंटल सरासरी चार ते साडेचार हजार रूपये दर मिळालेल्या कांद्याला आता कवडीमोल दर मिळत आहे. यात लागवडीचा खर्च निघणे तर सोडाच; पण पदरचे जास्त पैसे मोजण्याची पाळी येत असल्यामुळे शेतक-यांमधील नैराश्य कायम आहे.
हेही वाचा >>> Mandhardevi Yatra 2024 : मांढरदेव यात्रेला सुरुवात; ‘काळूबाईच्या’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतात आहे त्या परिस्थितीत कापून आणलेला कांदा, त्यातच अलिकडे हिट ॲन्ड रन प्रकरणात केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कायद्याच्या विरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संप व अन्य कारणांमुळेमागील दोन-अडीच महिन्यांपासून कांदा दर घसरण सुरूच आहे. दुसरीकडे एक दिवसाआड कांदा लिलाव होत असल्यामुळे लिलावाच्या दिवशी होणारी कांदा आवक जास्त वाढते. गेल्या मंगळवारी शेतक-यांनी ९८५ गाड्या भरून ९८ हजार ५७६ क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला असता ८०० रूपये ११०० रूपयांपर्यंत दर मिळाला होता. केवळ पाच क्विंटल कांद्या जास्त म्हणजेच जेमतेम २२०० रूपये दर मिळाला होता. तर आज गुरूवारी तब्बल एक लाख ४४ हजार ८०१ क्विंटल एवढा उच्चांकी कांदा दाखल झाला. परंतु सरासरी दर केवळ ७०० रूपयांपर्यंतच मिळू शकला. लागवड, मजुरी, औषध फवारणी, कापणी आणि वाहतूक या बाबींवर होणारा खर्च विचारात घेता कांद्याला प्रतिक्विंटल किमान चार ते साडेहजार रूपये मिळणे शेतक-यांना अपेक्षित होते. परंतु दर घसरणीमुळे आर्थिक ताळमेळ पूर्णतः विस्कटून गेल्यामुळे कांद्याने वांदा केल्याचे शेतकरी सांगतात.
वाहतूक खर्चही निघाला नाही
कांदा दर कोसळत असताना तयार झालेला कांदा शेतात तसाच ठेवला तर तो नासून जातो आणि जास्त नुकसानच होते. त्यामुळे ‘फूल ना फुलाची पाकळी’ समजून पडेल किंमतीत कांदा विकावा लागत आहे.
आज तीन-चार शेतक-यांनी मिळून सहा क्विंटल कांदा आणला. वाहतूक खर्च सात हजार रूपये झाला. लागवड, मजुरी, औषध फवारणी, काढणीचा खर्च हिशेबातच नाही. -बाळासाहेब राजेंद्र इंगळे, शेतकरी, धनेगाव, ता. तुळजापूर