करोना टाळेबंदीत नवीन कुलगुरू निवडीसाठी शोध समिती स्थापन करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाने आज घेतलेल्या ऑनलाईन निवडणूकीत डॉ.एस.माधेश्वरण विजयी झाले. विशेष म्हणजे देशातील विद्यापीठांच्या इतिहासात प्रथमच अशा पध्दतीने ऑनलाईन निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ ७ सप्टेंबर २०२० रोजी पूर्ण होत आहे.यासाठी व्यवस्थापन परिषद तसेच विद्या परिषदेतून एका व्यक्तीची निवड करावयाची होती. व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषद यात एकूण ४७ सदस्य आहेत. संपूर्ण देशात टाळेबंदी असताना या ४७ सदस्यांना गडचिरोली येथे हे बोलावून त्यांच्याकडून एका व्यक्तीची निवड करणे हे टाळेबंदीत अशक्य होते. परंतु तंत्रज्ञानाच्या मदतीने या मोबाईलवरील टेलेकॉन्फरन्सिंगच्या अप्लिकेशनद्वारे मुंबईपासून तर गडचिरोली पर्यंतचे ४७ सदस्य एकत्र येऊ शकले आणि ही निवडणूक यशस्वीरितीने पूर्ण झाली.

या निवडणुकीला डॉ. दिलीप मालवणकर आणि डॉ माधेश्वरण अशी दोन नावं पात्र ठरली होती. ही दोन्ही नावं अत्यंत उच्च विद्याविभूषित असल्यामुळे निवडणूक होऊच नये अशाप्रकारची भूमिका उच्च तंत्र शिक्षण भागातील समर्थ माने आणि डॉ. माई या दोन सदस्यांनी घेतली होती. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणक्षेत्रात अतिशय मोठं योगदान केल्यामुळे अशा विद्वान लोकांची निवडणूक होऊच नये अशी विनंती डॉ.माई यांनी केली. निवडणूक न घेता एक मताने नाव सुचवले तर विद्यापीठाची प्रतिमा उंचावेल अशीही त्यांनी सूचना केली. परंतु विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांनी निवडणूकीवर जोर दिला आणि शेवटी निवडणूक झाली.

आजच्या निवडणुकीच्या संयुक्त सभेत ४७ पैकी ४० सदस्यांनी भाग घेतला, चार सदस्यांनी अनुपस्थित राहायची रीतसर परवानगी मागितली, आणि तीन सदस्य अनुपस्थित राहिले. यापैकी एक सदस्य विदेशात आहेत. एकूण ३८ सदस्यांनी या निवडणुकीत आपले मत नोंदवले. व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेतील या एकत्र बैठकीचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी भूमिका बजावली.दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी प्रत्यक्ष ऑनलाइन निवडणुकीला सुरुवात झाली. निवडणुकीसाठी 45 मिनिटांचा वेळ  देण्यात आला होता. दुपारी एक वाजून दहा मिनिटाने या निवडणुकीचा निकाल सर्व सदस्यांना प्रत्यक्ष स्क्रीनवर दाखवण्यात आला. डॉ. एस. माधेश्वरण यांना 32 मत पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. दिलीप मालवणकर यांना 6 मत पडलीत. अशा रीतीने डॉ. एस. माधेश्वरण यांचा विजय झाला.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांना नवीन कुलगुरूंची नियुक्ती करण्यासाठी जी समिती असते त्या समितीत देशातील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश,राज्याच्या प्रधानसचिव पेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी, आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद तसेच विद्या परिषदेव्दारे निवड झालेली व्यक्ती असे उच्चशिक्षित व्यक्ती या समितीचे सदस्य असतात. या समितीत गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने डॉ. एस. माधेश्वरन यांची निवड झाली आहे.

Story img Loader