वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी तयार करण्यात आलेल्या हजारो प्रवेशपत्रात विविध स्वरूपाच्या गंभीर चुका असल्याचे उघड झाल्यानंतर आणि त्यांची दुरुस्ती करताना त्रुटींचे निराकरण करण्यात अपयश आल्यावर येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘ऑनलाइन’ प्रवेशपत्रांची उपरती झाली आहे. २३ मेपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यातील ४० हजार विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र या व्यवस्थेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विद्यापीठाने दिली आहे.
वैद्यकीय, दंतवैद्य, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी व तत्सम विद्याशाखांच्या प्रथम ते अंतिम वर्षांपर्यंतच्या परीक्षेला २३ मेपासून सुरुवात होत आहे. या परीक्षांच्या प्रवेशपत्रांची छपाई करताना गोंधळ घातला गेला. संगणकीय माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये चुका, परीक्षा केंद्राचा चुकीचा सांकेतिक क्रमांक, अनेक विद्यार्थ्यांना एकच आसन क्रमांक अथवा चुकीचे आसन क्रमांक, जुन्या व नव्या विषयांची चुकीची नोंद अशी वेगवेगळी करामत करण्यात आली. ही बाब लक्षात आल्यावर विद्यापीठातर्फे चुकांची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे १० हजार प्रवेशपत्रांचे पुनर्मुद्रण करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु पुनर्मुद्रित झालेल्या प्रवेशपत्रांमध्ये चुकांची परंपरा कायम राहिली. या संदर्भात विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर विद्यापीठाने घाईघाईने ‘ऑनलाइन’ प्रवेशपत्रांचा पर्याय निवडला आणि या घटनाक्रमांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. वास्तविक वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांच्या परीक्षांची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना किमान १५ दिवस आधी देणे अपेक्षित असते. कारण, अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी काही दिवस आधीच महाविद्यालयातून रजा घेतात. यंदा संगणकीय माहिती भरताना गोंधळ झाल्यामुळे त्यांना प्रवेशपत्र देणे अवघड बनले, परंतु विद्यापीठाने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे नमूद करत सर्व महाविद्यालयांना प्रवेशपत्र पोहोचल्याचा दावा केला.
परीक्षेला दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना मंगळवारी विद्यापीठाने तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ‘ऑनलाइन’ उपलब्ध करून दिले. राज्यभरातील ३११ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात १४० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ‘डब्लूडब्लूडब्लू.एमयूएचएस.इन’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. त्याची प्रत घेऊन स्वत:च्या छायाचित्रावर प्राचार्याची स्वाक्षरी घेऊन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसता येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. के. डी. गर्कळ यांनी म्हटले आहे.
आरोग्य विद्यापीठाला आता ‘ऑनलाइन’ प्रवेशपत्रांची उपरती
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी तयार करण्यात आलेल्या हजारो प्रवेशपत्रात विविध स्वरूपाच्या गंभीर चुका असल्याचे उघड झाल्यानंतर आणि त्यांची दुरुस्ती करताना त्रुटींचे निराकरण करण्यात अपयश आल्यावर येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘ऑनलाइन’ प्रवेशपत्रांची उपरती झाली आहे.
First published on: 22-05-2013 at 02:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online examination admission card facility by health collage