|| मंजिरी घरत

‘‘अरे शेखर, माझ्या गोळ्या संपत आल्या आहेत बरं. आणणार आहेस का आपल्या नेहमीच्या केमिस्टकडून?’’

Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
baba siddique murder case (1)
Baba Siddique Killing: “व्हीआयपी आमचं ऐकतच नाहीत”, सुरक्षा अधिकाऱ्यांची तक्रार; मांडल्या ‘या’ अडचणी!
Sunil Soman Statement on National Defence Pune news
‘आधी देशरक्षण, मगच कुटुंबाकडे लक्ष…’ सेनाधिकाऱ्याच्या या उद्गारांनी जेव्हा भारावतात श्रोते
BJP leader Munna Yadav explained about the abuse of the police Nagpur news
भाजप नेते मुन्ना यादवची कबुली, म्हणाले ” होय मी पोलिसांना शिवीगाळ केली, पण .. “
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Kalyan West youth chasing youth with sword in his hand and trying to kill him caputured in CCTV
कल्याणमध्ये तलवार हातात घेऊन हल्लेखोराचा तरूणाला मारण्याचा प्रयत्न
Loksatta kalakaran Gandhi Jayanti Gandhiji ​non violent satyagrah
कलाकरण: बंदुकीच्या अल्याडपल्याड…

‘‘नाही आई, मी मागवतो अ‍ॅपवरून. येतील घरी दोन दिवसांत औषधं.’’

‘‘बरं बाबा! यांच्या मोबाइलमध्ये जणू सारी बाजारपेठच सामावलीये. परवा म्हणाला, ‘अ‍ॅमेझॉनवरून पुस्तकं आणि कपडे मागवलेत. पार्सल येईल. नीट घे.’ मी दचकलेच. म्हटलं, ‘अ‍ॅमेझॉन? इतक्या दुरून?’ तर म्हणाला, ‘आई, कूल! अगं, अ‍ॅमेझॉन इंटरनेटवरच्या एका मार्केटचं नाव आहे.’ धान्यधुन्य, अगदी भाजीपालासुद्धा मला आणून दिला घरपोच इंटरनेटवरून मागवून. औषधंच काय ती बरीक राहिली होती. आता तेही चालू झालेलं दिसतंय..’’ आईची पुटपुट सुरूच होती.

‘‘हो. मग? जमानाच ऑनलाइनचा आहे आईसाहेब! शिकवेन मी तुलासुद्धा..’’ असं म्हणत शेखर निघून गेला.

गेली काही वर्षे भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मोबाइल स्मार्ट फोन्सनी तर क्रांतीच केलीय. ई-कॉमर्स भारतात झपाटय़ाने वाढते आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून यात ऑनलाइन फार्मसीचीही भर पडली आहे. अलीकडे तर चहूबाजूंनी या फार्मसीच्या जाहिरातींनी आपल्याला वेढून टाकले आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल्स, ई-मेल्स, एसएमएस.. असा जाहिरातींचा सर्व बाजूंनी मारा सुरू असतो. अनेक सेलेब्रिटीज् या जाहिरातींतून दिसतात. ‘कॉस्ट (डिस्काऊंट) अ‍ॅण्ड कन्व्हिनिअन्स’ अशा दोन ‘सी’ (उ) वर यात भर असतो. ‘ऑनलाइन फार्मसी’ किंवा ‘इंटरनेट फार्मसी’ अथवा ‘ई-फार्मसी’ म्हणजे प्रत्यक्ष दुकानात न जाता वेब पोर्टलवरून किंवा अ‍ॅपवरून औषधांची खरेदी करणे आणि औषधे घरपोच येणे. अशा वेब पोर्टल वा अ‍ॅपला म्हणायचे मार्केट प्लेस किंवा इंटरमेडीअरी किंवा टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म. औषधविक्रीच्या या ऑनलाइन पद्धतीची पुढील चर्चा करण्याआधी इतर वस्तू आणि औषधे यांतील मूलभूत फरक लक्षात घेणे जरुरीचे आहे.

औषधे ही इतर वस्तूंसारखी हौसेने खरेदी करण्याची वस्तू नव्हे. काही थोडी औषधे- म्हणजे पॅरासिटामोल अ‍ॅस्पिरीन, काही अँटॅसिड्स, रेचके वगैरे सोडली तर बाकी सारी औषधे ही प्रीस्क्रिप्शन औषधे (शेडय़ूल एच, एच वन, एक्स) म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच घेण्याची औषधे असतात. स्वमनाने घेण्याची नव्हे!

औषधांचा दर्जा, सुरक्षितता, गुणवत्ता यावर औषधोपचाराचे यश-अपयश अवलंबून असते. औषधे ही रसायने असल्याने तापमान, आद्र्रता, प्रकाश या साऱ्यांचा परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर होत असतो. यात काही कमी-अधिक होणे हे आरोग्यास घातक ठरू शकते. एकंदर औषधविक्रीचा व्यवसाय- मग तो ऑफलाइन असो (पारंपरिक औषध दुकाने) किंवा ऑनलाइन असो- हा अत्यंत जोखमीचा व जबाबदारीचा व्यवसाय आहे. आणि म्हणूनच त्यावर कडक नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे.

ऑफलाइन फार्मसीमध्ये दुकानदार आणि रुग्ण वा रुग्णाचे नातेवाईक यांची प्रत्यक्ष भेट होत असते. त्यांच्यात संवाद होत असतो.  फार्मसिस्टना रुग्णवर्तन व आसपासचे डॉक्टर माहीत असतात. औषधांबाबत काही शंका वाटल्यास रुग्ण लगेच औषधाच्या दुकानात जाऊन विचारणा करू शकतो. ऑनलाइन पद्धतीमध्ये मात्र या कोणत्याही शक्यता नसतात. औषधाचा रुग्णापर्यंतचा प्रवास हा अदृश्यपणे होत असतो.. समोर घडत नसतो. घरपोच डिलिव्हरी येईपर्यंत औषधे एक, दोन, तीन किंवा त्याहून अधिक दिवस कुरिअर/ पोस्टाच्या प्रवासात असतात. ही औषधे नेमकी कुठून येणार आहेत याचीही रुग्णाला कल्पना नसते. अगदी वरवर विचार केला तरी ऑनलाइनमध्ये गैरप्रकार होण्यास भरपूर वाव असतो हे लक्षात येते.  त्यामुळेच या पद्धतीच्या औषधविक्रीचे नियमन, नियंत्रण करणे हे अधिक आव्हानात्मक; परंतु रुग्णहिताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असते.

भारत ही औषधांची एक प्रचंड  मोठी बाजारपेठ आहे. दरवर्षी औषध व्यवसाय पंधरा टक्क्य़ांनी वाढत आहे. प्रचंड लोकसंख्या, तसेच सरासरी आयुर्मानातील वाढीबरोबरच अनारोग्याचे वाढते ओझे आणि त्यामुळे सातत्याने वाढणारी औषधांची मागणी हे चित्र गुंतवणूकदारांकरता अर्थातच फार आकर्षक आणि आश्वासक मार्केट आहे. आणि ते काही फार कडकपणे सुनियंत्रित नाही. या सगळ्या परिस्थितीचा फायदा उठवत ऑनलाइन फार्मसी  अत्यंत आक्रमकपणे मार्केटिंग करत भारतात पाय रोवून स्थिर होत आहे. ९० हजार कोटी इतके त्यांचे मार्केट असावे, किंवा सन २०२० पर्यंत ते तितके होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ऑनलाइन फार्मसींची इतकी घोडदौड वाचून त्याचे नियंत्रण करण्यासाठी खूप कडक नियमावली असेल, नवीन कायदे वगैरे असतील असे आपणास साहजिकच वाटले असेल. पण खरी मेख तर इथेच आहे. अजून तरी ऑनलाइन औषधविक्रीसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली जारी करण्यात आलेली नाही. ती अस्तित्वात येण्याआधीच ऑनलाइनने आपले बस्तान बसवले आहे. हे निश्चितच आश्चर्यकारक आहेच; आणि सामाजिक आरोग्यास धोकादायकही! औषधविक्री आणि वितरण नियंत्रित करण्यासाठी १९४० चा ड्रग आणि कॉस्मेटिक अ‍ॅक्ट आणि १९४५ चे नियम आहेत. औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शननुसार रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली परवानाधारक दुकानांमधूनच  होणे या ड्रग अ‍ॅक्टनुसार आवश्यक आहे. अर्थात ज्या काळात हा कायदा बनला तेव्हा इंटरनेट, ऑनलाइन विक्री हे काहीच दृष्टिपथात नव्हते. साहजिकच  हा कायदा ऑफलाइन फार्मसी समोर ठेवून केलेला होता. ऑनलाइन विक्रीची धाटणी पूर्ण वेगळी असल्याने त्यासाठी या ड्रग अ‍ॅक्टची मूलभूतता केंद्रस्थानी ठेवून,  (प्रीस्क्रिप्शन, फार्मसिस्ट आणि ड्रग लायसन्स) कायद्यात दुरुस्ती करून त्यासंबंधीचे तपशीलवार नवीन नियम करणे गरजेचे आहे. आणि तोपर्यंत  ऑनलाइन औषधविक्री होताच कामा नये. पण आज आपण भलतेच चित्र पाहतो आहोत.

आपल्या समाजात औषधविषयक वर्तन कसे आहे? आपल्याकडे आरोग्य साक्षरता आणि औषध साक्षरता मुळीच रुजलेली नाही. स्वत:च आपल्या आजाराचं अंदाजे अनुमान करून त्यानुसार औषध घेण्याचे (सेल्फ मेडिकेशन) प्रमाण आपल्याकडे भरपूर आहे. औषधांचा चुकीचा वापर, प्रीस्क्रिप्शन औषधांचा नशेसाठी वाढता वापर, अँटिबायॉटिक रेसिस्टन्स या साऱ्या समस्या आहेत. आपली ऑफलाइन फार्मसी प्रॅक्टिस कशी आहे? देशभरातील ७-७.५ लाख औषध दुकानांपैकी अनेक ठिकाणी फार्मसिस्ट नसणे, प्रीस्क्रिप्शन औषधांची विक्री  प्रीस्क्रिप्शनशिवायच होणे वगैरे कायद्याचे ढळढळीत उल्लंघन होताना दिसते. तुलनेने महाराष्ट्र, गोवा अशा काही मोजक्या राज्यांमध्येच याबाबतीत चांगली स्थिती आहे. येथे कार्यक्षम प्रशासन आणि जागरुक फार्मासिस्ट आहेत. परंतु हे चित्र संपूर्ण देशात आढळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आपण अजून ऑफलाइन फार्मसीवरही  पूर्णपणे नियंत्रण करू शकलेलो नाही.  आणि अशा स्थितीत आपण अशी एक व्यवस्था उभी राहू देतोय, जिच्यात अंगभूतपणेच (by default) औषधांचा गैरव्यवहार होऊ शकतो. या व्यवस्थेचे नियंत्रण हे तर अधिकच आव्हानात्मक आहे. तेही चक्क कोणतेही नवीन कायदे वा नियम न बनवता आपण घडू देतोय.  हे सर्व फार premature आहे. त्याचबरोबर ऑफलाइन फार्मसी प्रॅक्टिस सुधारण्याचा प्रयत्न करणेही तातडीने गरजेचे आहे. कायद्याची अंमलबजावणीही तीव्र व्हायलाच हवी. ‘औषध दुकानांमध्येच नियम पाळले जात नाहीत; मग ऑनलाइन फार्मसीलाच कायद्याचा बडगा का?’ असा विचार जर कुणी मांडला तर तो आरोग्य क्षेत्रात अराजकालाच निमंत्रण देणारा ठरेल.

या पाश्र्वभूमीवर परदेशातील ऑनलाइन फार्मसीचे अस्तित्व आणि तद्संबंधीचे नियम जाणून घेणे उद्बोधक ठरेल. जगभरात इंटरनेटच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या औषधांपैकी ५०% औषधे ही बनावट, कमी दर्जाची असू शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटना (WHO) देते. ‘इंटरनेट फार्मसी हे क्षेत्र असे आहे, की ज्यात समाजकंटक सहजपणे अनेक गैरप्रकार करू शकतात. बेकायदेशीर वेबसाइट्स, औषधे एका देशातून दुसऱ्या देशांत ऑर्डर करणे, वगैरे प्रकार होऊ शकतात. ‘व्हायग्रा’सारख्या औषधांना  इंटरनेटवर भरपूर मागणी असते. ‘जे न मिळे प्रत्यक्षात, ते मिळे इंटरनेटच्या अवकाशात’ हे औषधांबाबतही शोधण्याचा माणसांचा प्रयत्न असतो. त्याचा मागोवा घेणे वा माग ठेवणे हे अत्यंत  जिकिरीचे असते. इंटरनेट फार्मसीच्या या अंगभूत अवगुणांमुळे बहुतांश देश (त्यातही विकसित देश) हे ऑनलाइन औषधविक्रीच्या  प्रकाराकडे कायम संशयी चष्म्याने बघतात. त्याबाबतीत अतिसावध असतात. रुग्णहित, समाजाचे आरोग्य जपण्यासाठी हे देश तत्पर व जागरूक असतात. काही देशांमध्ये तर प्रीस्क्रिप्शन औषधांच्या ऑनलाइन विक्रीला कायद्याने पूर्ण बंदीच आहे. फ्रान्स आणि जपानसारख्या देशांत फक्त OTC (Over The Counter…  माणूस स्वमनाने घेऊ शकतो अशी व डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनची गरज नसलेली किरकोळ आजारांवरची औषधे) औषधेच ऑनलाइन मिळतात. फ्रान्समध्येही ही OTC औषधे विक्रीसाठीसुद्धा अनेक अटी आहेत. तिथे Good Dispensing Practices For Online Salel ही लागू केलेल्या आहेत. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांत जरी प्रीस्क्रिप्शन औषधेही ऑनलाइन विकता येत असली तरी त्यांच्या कार्यपद्धतीसाठी बारीकसारीक तपशिलांसह सुस्पष्ट नियमावली आहे. आणि ती पाळली जाते की नाही यावर प्रशासनाची कडक नजर असते. यातील अनेक देशांत E-Prescription (डॉक्टरांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून थेट फार्मसीला प्रीस्क्रिप्शन पाठवणे.) पद्धती रूढ आहे. तेही रुग्ण पहिल्यांदाच ती औषधे घेत असेल तर ऑफलाइन फार्मसीत जाणे, फार्मसिस्ट समुपदेशन वगैरे आवश्यक असते. रीपिट प्रीस्क्रिप्शन / रिफिलसाठी -e -prescription चालते. रुग्णाकडे हार्ड कॉपी प्रीस्क्रिप्शन असेल तर त्याने वेब पोर्टलवर ते अपलोड करण्याची सोय काही देशांतून आहे. पण मूळ प्रीस्क्रिप्शन फार्मसीला पोस्टाने / कुरिअरने पाठवावेच लागते. ते मिळाल्याशिवाय फार्मसी औषधांची ऑर्डर पाठवीत नाही. जर मूळ प्रीस्क्रिप्शन पाठवले नाही तर ऑर्डर रद्द होते. एकंदरच आरोग्य क्षेत्रात सुसूत्रता असल्याने आणि सर्व ‘डेटाबेस’ उत्कृष्ट असल्याने प्रीस्क्रिप्शन त्या देशातील नोंदणीकृत डॉक्टरांचे आहे की नाही, तसेच इतर गोष्टीही तपासून पाहणे या ऑनलाइन फार्मसींना शक्य असते आणि ते केलेही जाते. कुठेही ऑनलाइन अवकाशातील डॉक्टर जुजबी फोन कॉलद्वारे रुग्णासाठी औषधाचे प्रीस्क्रिप्शन देत नाही. जर कोणत्या वेब पोर्टल्स असे काही करू लागल्या तर ते अयोग्य मानले जाते. अमेरिकेत रुग्णाकडे प्रीस्क्रिप्शन नसेल तर रुग्ण तो घेत असलेल्या नेहमीच्या औषधांची नावे वेब पोर्टलवर नोंदवतो. सोबत त्याच्या नेहमीच्या डॉक्टरांची माहिती देतो. त्यानंतर ऑनलाइन फार्मसिस्ट त्या डॉक्टरना फोन करून सर्व तपशिलांची खातरजमा करून घेतो. मग त्या डॉक्टरांकडूनच फार्मसीला थेट प्रीस्क्रिप्शन  येते. रुग्ण स्वत:च प्रीस्क्रिप्शन ई-मेल, अपलोड वा फॅक्स करू शकत नाही.

बहुतांश देशांतील इंटरनेट फार्मसींची स्वत:ची औषध दुकानेही असतात. या फार्मसींच्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष ठिकाण (Physical address) असते. त्यांचे निव्वळ ‘डॉट कॉम’ इतकेच अस्तित्व नसते. रुग्णासंबंधीचा सर्व ‘डिजिटल डाटा’ सुरक्षित राहावा, तो तिऱ्हाईतांना दिला जाऊ नये, त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी अत्यंत कडक कायदे त्यांच्याकडे लागू आहेत. त्यामुळे रुग्णाची माहिती गोपनीय व सुरक्षित राहण्यास मदत होते. बहुतेक देशांमध्ये ऑनलाइन फार्मसीच्या कामाच्या कक्षा- म्हणजे त्यांनी कोणत्या राज्यांमध्ये औषधे विकायची की संपूर्ण देशभर- हे सर्व निश्चित केलेले असते. त्या प्रकारचे परवाने मिळवणे फार्मसीला बंधनकारक असते. अशा औषधविक्रीच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्यास ती जबाबदारी कोणा- कोणाची (वेब पोर्टल, प्रत्यक्षातील फार्मसी वगैरे), कुठे तक्रार करायची, हे सर्व स्पष्ट असते आणि रुग्णांना ही सगळी माहिती उपलब्ध असते. शासन-प्रशासन रुग्णांना इंटरनेट फार्मसीच्या वापराबद्दल विविध सूचना देऊन नेहमी सावध करत असते. कोणत्या वेबसाइट्स खऱ्या आहेत, त्या कशा ओळखायच्या, त्यांचे विशिष्ट लोगो या सगळ्याची माहिती ग्राहकांना दिली जाते. संबंधित प्रशासनाच्या वेबसाइट्सवर अधिकृत ऑनलाइन फार्मसींची यादी, तसेच काळ्या यादीतील फार्मसींची यादीही उपलब्ध असते. अमेरिकेत श्कढढर (VIPPS (Verified Internet Pharmacy Practice Sites) ने मानांकित (Accredited) फार्मसीचीच शिफारस ग्राहकांना केली जाते. युरोपिअन पार्लमेंटपासून ऑस्ट्रेलियन शासनापर्यंत सर्वच जण ग्राहकांना, इंटरनेट हा काही औषधविक्रीसाठी Most Prefered मार्ग नाही, हे सूचित करताना दिसतात. परंतु खूप दुर्गम भागातील लोकांसाठी या सेवा आवश्यक आणि उपयुक्त आहेत हेही ते मान्य करतात. ‘मेल ऑर्डर फार्मसी’ हा प्रकार अनेक दशकांपासून पाश्चात्त्य देशांत होताच; त्यात आता साधारण गेल्या दोन दशकांपासून ऑनलाइन फार्मसी व्यवस्थाही अस्तित्वात आली आहे.

विकसित देशांतील प्रशासन अत्यंत कडकपणे नियमांची अंमलबजावणी करत असले तरी काही चुकार वेबसाइट्स त्यांचा डोळा चुकवून  गैरव्यवहार व नियमबा गोष्टी करीतच असतात. एकंदर ऑनलाइन औषधविक्रीवर योग्य तो अंकुश ठेवणे हे त्यांच्याकरताही मोठे आव्हान असते.

परदेशातील ऑनलाइन फार्मसी व्यवस्थेची  परिस्थिती पाहता आपल्या देशात आपण या व्यवस्थेच्या बाबतीत खूपच घाई करत आहोत आणि एकंदर आपला दृष्टिकोण नको इतका सैल आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच.

आपल्या देशात अगदी सर्वत्र औषध दुकाने आहेत. ग्राहकांकडून ऑनलाइन औषधांसाठी कुठेही मागणी वा आग्रह धरला गेलेला नाही. त्यामुळे ऑनलाइनची आपल्याला खूप निकड आहे अशातला भाग नाही. त्यामुळे अगदी दुर्गम भागात या सेवेमुळे औषधांची उपलब्धता वाढेल, रुग्णांना औषधे मिळतील असे म्हणावे तर तेथील रुग्ण इतके तंत्रज्ञानसाक्षर आहेत का, तिथे  कुरिअर पोहोचेल का, हेही प्रश्न आहेतच.

ऑनलाइन फार्मसी सुरू झाल्यापासून त्याविषयी अनेक तक्रारी केल्या जात आहेत. बंदी असलेली औषधे विकणे, गर्भपाताच्या गोळ्या, कामोत्तेजक औषधे वा इतर प्रीस्क्रिप्शन औषधांची विक्री परवाना नसताना करणे, आदी गुन्ह्यंसाठी अनेक वेबसाइट्सवर महाराष्ट्रात कारवाई झालेली आहे. त्यातून काहींचे व्यवहार बंदही पडले आहेत. ऑनलाइन औषधविक्रीतील या गैरप्रकारांचे पडसाद थेट लोकसभेपर्यंत उमटले आहेत. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी- ‘आम्ही लगेच ड्रग अ‍ॅक्टमध्ये काही बदल करत नाही आहोत. ऑनलाइनची पूर्ण कार्यपद्धती सुनिश्चित केल्यावरच ऑनलाइन औषधविक्रीला आम्ही परवानगी देऊ,’ असे म्हटल्याचे वाचनात आले. त्यानंतर या संबंधात एका समितीची स्थापना झाली. ड्रग्ज कंट्रोलरने २०१५ च्या शेवटी परिपत्रक काढून सर्व राज्यांना ‘ऑनलाइन औषधविक्रीत भरपूर गैरप्रकार  होण्यास वाव आहे, तेव्हा त्यावर कडक नजर ठेवा, ड्रग अ‍ॅक्टचे उल्लंघन होत नाही ना हे बघा,’ असे कळवले आहे. परंतु यासंदर्भात ‘नियम तयार होईपर्यंत ऑनलाइन औषधविक्री थांबवा..’ असा काही फतवा त्यांनी काढलेला नाही. त्यामुळे एकीकडे नियम बनवण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू आहे, परंतु दुसरीकडे ऑनलाइन औषधविक्रीही चालू आहे असे चित्र सध्या दिसते आहे. हा लेख लिहीत असतानाच अशा औषधविक्रीबाबतच्या दोन तक्रारी समोर आल्या. पंजाबमध्ये ऑनलाइनद्वारे नशिल्या औषधांची, स्टिरॉइड्सची, सीरिंजेसची प्रचंड विक्री गैर प्रकारे होते आहे अशी एक तक्रार आहे. यापूर्वीही अर्थात अशा तऱ्हेच्या अनेक तक्रारी येत होत्याच. त्यामुळे व्यसनाधीनता वाढत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दुसरी तक्रार दिल्लीतील एका वेब पोर्टलसंबंधीची होती. कोणत्याही प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे विकणे, ऑनलाइन फार्मसिस्ट नसणे, त्याऐवजी दुसराच स्टाफ असणे अशी ही तक्रार होती. अर्थात  काही वेबसाइट्स सध्याच्या ड्रग अ‍ॅक्टमधील मूलभूतता ओढूनताणून का होईना, आपल्या मॉडेलमध्ये बसवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

ड्रग्ज कंट्रोलर ऑफिसने ऑनलाइनसाठी नियमांचा एक मसुदा जाहीर केला आहे आणि त्यावर मतेही मागवली आहेत. परंतु हा मसुदा परिपूर्ण नाही. अनेक बाबतींत त्यात सुस्पष्टता नाही. हे नियम परिपूर्ण हवेत, त्यावर व्यापक विचार व्हायला हवा. ऑनलाइन फार्मसी नकोच असे आजच्या आधुनिक काळात म्हणणे कठीण आहे. अर्थात मार्केटचा रेटा कितीही प्रभावी असला तरी वास्तवाची यथार्थ जाणीव ठेवणे आणि याबाबतीत अनावश्यक घाई न करणे रुग्णसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

औषध दुकानदारांत अस्वस्थता!

ऑनलाइन फार्मसींचे पेव फुटल्याने आणि त्यांच्या आक्रमक जाहिरातींमुळे औषध दुकानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काहींना- विशेषत: शहरांमध्ये औषधविक्रीवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. आपले जुनाट आजारांचे रुग्ण (मधुमेही, हृद्रोगी वगैरे) हे ऑनलाइनकडे वळू शकतात अशी चिंता फार्मसिस्टना सतावते आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायाचे भविष्य धोक्यात येणार असल्याची चिंता त्यांना भेडसावते आहे. ‘जो-तो औषधांवर डिस्काऊंट किती देणार, हे विचारतो. हे लोक इतर गोष्टींवर भरपूर पैसे खर्च करतील, पण किरकोळ १५-२० रु.च्या औषधावरही त्यांना डिस्काऊंटची अपेक्षा असते. आम्हीही मग जमेल तसे कमी-जास्त डिस्काऊंट देतो. आमच्यात आपापसातही स्पर्धा असतेच.’ ..मुंबईतील एका फार्मसिस्टने व्यक्त केलेली ही व्यथा बरंच काही सांगून जाते.

प्रत्येक क्षेत्रात कधी ना कधी असा ‘नया दौर’ येतोच. त्यापायी प्रस्थापित व्यवस्थेला धक्का बसतो. काही काळ याचा त्रास होतो. नुकसानही होते बऱ्याचदा. परंतु नवी आणि जुनी अशा  दोन्ही व्यवस्था एकत्र नांदतात असेही अनेक क्षेत्रांत आढळते. सुपर मार्केट, मॉल्स आले तरी कोपऱ्यावरचे वाणी व छोटी दुकानेही टिकली आहेतच.

ऑनलाइन फार्मसीचे भविष्य काय? नवीन नियम येऊन ऑनलाइन  फार्मसी अधिक फोफावणार की त्यावर बंदी येणार? हे यथावकाश समजेलच. पण या संभाव्य स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपले स्थान मजबूत करण्याची तयारी फार्मसी व्यावसायिकांनाही ठेवावीच लागेल. अशी आव्हाने पेलणे ही काळाची गरज आहे. ऑनलाइनकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, तर पारंपरिक फार्मसीकडे रुग्णांशी थेट संवाद साधण्याची संधी आहे. या कार्यपद्धतीत औषधविक्रेत्याचा रुग्णाशी थेट व्यक्तिगत संबंध येतो आणि हे या व्यवस्थेचे बलस्थानही आहे. अधिकाधिक मूल्यवर्धित सेवा देऊन आपल्या ग्राहकांशी असलेले नाते घट्ट करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे. पाश्चात्त्य देशांत अनेक वर्षांपासून ऑनलाइन फार्मसी अस्तित्वात असल्या तरीही रुग्णांची पावले आपल्या फार्मसीकडेच वळतात. ऑनलाइन औषधे घेणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे फार्मसिस्टचे  रुग्णमित्र, समुपदेशक म्हणूनचे कार्य.. जे रुग्णांना उपयुक्त वाटते. फार्मसिस्टशी बोलून त्यांना दिलासा वाटतो. फार्मसिस्ट हा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला दुवा आहे. अनेक पाश्चात्त्य देशांत ‘सर्वात विश्वसनीय व्यावसायिक’ म्हणून समाज त्याच्याकडे बघतो. आज आपल्याकडे ऑनलाइनकडे वळणाऱ्या रुग्णाला दुकानात प्रत्यक्ष न गेल्याने आपण फार काही गमावले, फार्मसिस्टच्या सल्लामसलतीला आपण मुकतोय असे वाटत नाही. या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. त्याकरता या व्यवसायाचे ‘औषधविक्री’ हे नुसते धंदेवाईक स्वरूप बदलायला हवे. कायद्यांचे पालन व्हायला हवे. हा विचार सर्व संबंधितांनी- म्हणजे फार्मसिस्ट घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांपासून ते धोरणकर्त्यांपर्यंत सर्वानीच करायला हवा.

अ‍ॅमेझॉनने ‘पिलपॅक’ कंपनीशी करार करून प्रीस्क्रिप्शन औषधांच्या क्षेत्रात प्रवेश केल्याची घोषणा नुकतीच अमेरिकेत केली. त्यामुळे तेथील फार्मसी जग हादरले. परंतु ‘अ‍ॅमेझॉनकडे टेक्नॉलॉजी असेल तर तुमच्याकडे मानवी संवादाची संधी आहे. त्यावर काम करा..’ हा तिथल्या तज्ज्ञांचा सल्ला आपल्या दृष्टीनेही मोलाचा आहे. काळाच्या ओघात टिकून राहायचे असेल तर रुग्णाभिमुख होण्यावाचून पर्याय नाही.

symghar@yahoo.com