पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजांसाठी मंदिर समितीने आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठीची संगणकप्रणाली विकसित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची पूजा करण्याची भाविकांची इच्छा असते. सद्य:स्थितीत प्रत्यक्ष मंदिर समितीकडे जाऊन जी पूजा करायची आहे, त्याबाबत उपलब्धता आणि इतर गोष्टींचा सोपस्कार करावा लागतो. मात्र, बाहेरगावच्या भक्तांना पूजेची माहिती आणि पूजा करण्याची तारीख, वेळ घरबसल्या सहज आणि सुलभरीत्या निश्चित करता यावी, अशी मागणी मंदिर समितीकडे आली होती. त्यानुसार मंदिरातील सर्व पूजांची नोंद ‘ऑनलाइन’ करता यावी, यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. भाविकांना अल्प देणगी मूल्य आकारून विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येतात.

हेही वाचा >>>लाडकी बहीण’ लाभाची रक्कम परस्पर वळती करण्याचे प्रकार

याबाबतची संगणक प्रणाली विकसित झाली असून, याबाबत चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. १ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पूजा नोंद करता येईल, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

नामदेव पायरीच्या दरवाजास चांदी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील भाविक चांदी बसवून देणार आहेत. शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार हे दिगंबर तुकाराम अरगुलवार आणि जनाबाई दिगंबर अरगुलवार यांच्या स्मरणार्थ हे काम करून देणार आहेत. त्यासाठी सुमारे ३० किलो चांदीचा वापर करण्यात येणार आहे. बाजारमूल्यानुसार सुमारे २६ लक्ष इतकी त्याची किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online registration for pooja of sri vitthal and rukminimata temple at pandharpur amy