कल्पेश भोईर

मागील काही वर्षांपासून मच्छीमार बांधव विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जात आहेत. याच मच्छीमारांच्या व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी बोंबील स्मार्ट कोळीवाडा प्रकल्प उभारला आहे. ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून ताज्या मासळीची विक्री करून  बाजारपेठा विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

आधुनिकतेच्या बदलत्या काळात तरुणाईला रोजगार उपलब्ध व्हावा व स्थानिक भूमिपुत्रांच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने अलिबाग येथे राहणारे नासा शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांनी ‘बोंबील अ‍ॅप’ तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे ठाणे, पालघर, वसई, मुंबई, अलिबाग, भिवंडी येथील मच्छीमार बांधव व मासळी विक्रेते यात जोडण्यात आले असून ग्राहकांना आता थेट ताजी व स्वस्त दरात मासळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या तयार करण्यात आलेल्या नवीन प्रकल्पाला विक्रेत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत या अ‍ॅपमध्ये ६५० मासळी विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. यासोबतच खवय्यांनीही याला भरघोस प्रतिसाद देत आतापर्यंत ३० हजार जणांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केला असल्याची माहिती सुशांत पाटील यांनी दिली आहे. या प्रकल्पाला दोन टप्प्यांत राबविण्यात येत असून यामध्ये मासळी नाखवांकडून विक्रीसाठी कोळणी महिलांकडे दिली जाईल व त्यांच्याद्वारे ही मासळी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाईल यामुळे मच्छीमार बांधव, विक्रेत व ग्राहक यांची साखळी तयार होणार असून याचा स्थानिक भूमिपुत्रांना चांगला फायदा होईल, असा विश्वास प्रणित पाटील यांनी व्यक्त केला आहे. अ‍ॅपचे नाव बोंबील अ‍ॅप असे जरी असले तरी कोळंबी, पापलेट, सुरमई, बांगडा, वाव यासह इतर सर्व प्रकारची मासळी खवय्यांना उपलब्ध होणार आहे. तर ओल्या मासळीसोबतच हंगामात उपलब्ध होणारी सुकी मासळीची विक्री केली जाणार आहे. बोंबील, करंदी, जवळा, वागटी, मांदेली यांचा समावेश आहे. यातून रोजगाराची चांगली  संधी उपलब्ध आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सेवा सुरू

‘मावरा तुमचे घरा’ या टायटलखाली ऑनलाइन मासे विक्रीची सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सध्या स्थितीत ठाणे, कळवा, खारीगाव, सोनाळे भिवंडी, टिटवाळा, बेलापूर, भांडुप, प्रभादेवी, वसई घाटकोपर  परिसरातमासे विक्री सुरू केली आहे.

बोंबील अ‍ॅपच्या साहाय्याने स्थानिक मच्छीमार बांधव व मासळी विक्रेते यांना एकत्रित करून ग्राहकांना ताजी मासळी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यातून आगरी कोळी संस्कृतीचे जतन होईल

-प्रणित पाटील,  नासा शास्त्रज्ञ व अ‍ॅपचे निर्माते अलिबाग

Story img Loader