कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठलाचे दर्शन तहसील कार्यालयातील ‘ऑनलाईन’ नोंदणीद्वारे करण्यात येणार असून यामध्ये प्रथम पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ातून ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, तर भक्तांच्या सोयीकरिता विठ्ठल वाहिनी चालू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी संत तुकाराम भवन येथे समितीची बैठक संपन्न झाली. त्यात विविध ठराव मंजूर करण्यात आले. कार्तिकी यात्रा आढावा बैठकही यानंतर संपन्न झाली. यास महसूल विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, कार्यकारी अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते.
विठ्ठल दर्शनाची ही ‘ऑनलाईन’ सोय सेतू कार्यालयात नाममात्र शुल्क भरल्यावर तेथे फोटोसह फॉर्म भरून दिल्यानंतर त्याबद्दलची माहिती ऑनलाईनद्वारे देण्यात येणार असून ही सुविधा कार्तिकी यात्रेपुरती आहे. समिती स्वत:ची पंढरपूर विठ्ठलदर्शन वाहिनी चालू करण्याचा विचार करत आहे असे डांगे यांनी सांगितले. विठ्ठल मंदिर समितीची गोशाळा असून ती बांधण्यात येणार आहे. तेथे साठणाऱ्या शेणापासून गोबर गॅस तयार करण्यात येणार आहे. त्याचा फायदा समितीला होणार आहे. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी समिती प्रयत्नशील आहे, असे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी सांगितले.
—–