कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबबादारी पोलिसांबरोबरच नागरिकांचीही असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी पारनेर येथे बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पारनेर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हजारे बोलत होते. पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, निरीक्षक सुनील शिवरकर, सहायक निरीक्षक मारूती मुळूक, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहूल शिंदे, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर आदी यावेळी उपस्थित होते.
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे देशाची मान शरमेने खाली गेल्याचे सांगून हजारे म्हणाले, या अमानुष घटनेनंतर देशातील जनता रस्त्यावर उतरली. जे  काम पोलीस यंत्रणेकडून होणार नव्हते, ते काम लोक रस्त्यावर उतरल्यामुळे झाले. दिल्लीसारख्या घटना यापुढील काळात होऊ नयेत यासाठी तरूणांनी सजग राहणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यासारख्या थोर पुरूषांना घडवणारी स्त्री आदर्श माता असून भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान उच्च आहे. त्यासाठी प्रत्येकाने परस्त्रीकडे माता अथवा बहीण या भावनेने पाहिले पाहिजे. संस्कार संपल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण होऊ लागल्याने युवा पिढी भरकटली आहे. विविध वाहिन्यांवरील अश्लील दृष्ये पाहून त्याचा प्रभाव तरूणांवर होतो व तरूण त्याच मार्गाने पुढे जातो. ऋषीमुनींपासून भारतीय संस्कृतीने त्यागाची शिकवण दिली आहे. त्यागातूनच शांती मिळते. सेनापती बापट हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण असून युवकांनी तीच परंपरा पुढे जोपासण्याची गरज आहे, असे हजारे म्हणाले. सुरूवातीला पोलीस अधीक्षक शिंदे यांनी प्रास्ताविक केले.