मराठवाडी धरणग्रस्तांना वेळोवेळी आश्वासने दिली जातात, मात्र दिलेल्या शब्दांची पूर्तता कधीच केली जात नाही. आम्हाला या बैठकीत जे बोलू त्याचे लिखित स्वरूपात पत्र द्या. जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या दालनातून उठणार नाही, असा निर्धार धरणग्रस्तांच्या नेत्या सुनीती सु. र. यांनी व्यक्त केल्यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी शासनातील वरिष्ठ अधिका-यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पुन्हा एकदा धरणग्रस्तांना आश्वासन मिळाले.
सोमवारी वांग- मराठवाडी धरणग्रस्तांच्या नेत्या सुनीती सु. र. यांनी धरणग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्या दालनात सुमारे पन्नासावर धरणग्रस्तांनी ठिय्या मारला. अनेक तक्रारी, गैरसोयींचा पाढा धरणग्रस्तांनी वाचून दाखवला. धरणग्रस्तांना ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात नुकसान भरपाईचे पैसे मिळायला पाहिजे होते. तसेच पुनर्वसनाच्या प्रक्रियेला वेग यायला पाहिजे होता, मात्र अद्याप यातील कोणतेही काम झाले नाही. जानेवारी – फेब्रुवारीमध्ये झालेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीच्या कागदपत्रांवर सह्या झाल्याचे पालकमंत्री ना. शिंदे सांगत होते, मात्र नुकसानभरपाई मिळाली नाही. सिंचनाकडून पुनर्वसनाकडे, पुनर्वसनाकडून महसूल विभागाकडे फाइल फिरत असल्याचे सांगतात, मात्र नुकसानभरपाई मिळत नाही हे सत्य धरणग्रस्तांनी यादव यांना सांगितले.
कार्यकारी अभियंता गिरी यांच्याशी या वेळी संपर्क साधण्यात आला. त्यांना मराठवाडीतील पाणी सोडा आणि पूररेषेच्या वर पाणी येणार नाही याची काळजी घ्या, असे सुनीती सु. र. यांनी दूरध्वनीवरून सांगितले. तसेच घळीचे काम केल्यास पुराचा धोका कमी होईल का, असेही पाहण्यास सांगितले. महसूल विभाग, पाटबंधारे, कृष्णा खोरे यांच्या सगळ्यांच्या एकत्र बैठकीचा प्रस्ताव धरणग्रस्तांसमोर मांडला जातो आणि सोमवापर्यंत बैठक नक्की केली जाते. धरणग्रस्तांना आता पैसे कधी मिळणार, या पावसाळ्यात त्यांचे पुन्हा हाल होणार का, शासकीय पातळीवर पुन्हा एकदा कागदी घोडे नाचवले जाणार का हे सगळे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. मुख्यमंत्री ज्या पाटण तालुक्यातले आहेत तिथलेच हे सगळे धरणग्रस्त आहेत. मुख्यमंत्री चव्हाण गाववाल्यांचा प्रश्न म्हणून तरी याकडे पाहणार का आणि त्यांनी आता तरी हे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा सुनीती सु. र. यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा