मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम २४ ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे २४ तारखेला सरकार मराठा समाजाला आरक्षण जाहीर करतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला.
“मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशा आहे. सरकार २४ तारखेला आम्हाला आरक्षण देणार. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान राखून त्यांचा सन्मान केला आहे. आता त्यांनी त्यांच्या शब्दाचा मान राखून आमचा सन्मान करावा. गाफिलपणे राहून मराठा समाजाचा अवमान करू नये”, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण समितीने अजून दोन महिन्यांचा अवधी मागितली आहे. हा दोन महिन्यांचा अवधी देणार का? असा प्रश्न जरांगे पाटलांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, समितीने कितीही वेळ मागुद्यात. पण सरकार आणि मुख्यमंत्री वेळ वाढवून देणार नाहीत. मुख्यमंत्री २४ तारखेला आरक्षण देणारच. तीस दिवसांऐवजी ४० दिवसांचा अवधी देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा समाजाला कधीच दगाफटका करणार नाहीत.
हेही वाचा >> भाजपा-शिवसेना युतीबद्दल काय वाटतं? नितीन गडकरींचं मजेशीर उत्तर, प्रेक्षकही खळखळून हसले!
आत्महत्या करू नका
“महाराष्ट्रातील समाजाला आणि तरुणांना मी विनंती करतो की मरण्यापेक्षा लढा. आत्महत्या करायची नाही. आत्महत्या करून स्वतःचं कुटुंब उघड्यावर पडायला लागली आहेत. एकानेही आत्महत्या करायची नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाने घराघरात सांगा की आत्महत्या कोणी करायची नाही. तुम्ही आत्महत्या केली तर आरक्षण कोणाला द्यायचं? त्यापेक्षा लढा ना. आत्महत्या करून तुमचंच कुटुंब उघड्यावर पडणार आहे. आपल्या आई-बापाकडे कोणी लक्ष देत नाही, आपल्या मुलांकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. आपण त्यांच्या रक्ताचे वंशज आहोत, आपण छत्रपतींचे वंशज असल्याने आपण लढायचं आहे. मरायचं नाही. आत्महत्येने एक माणूस कमी होतोय. आपली माणसं वाढली पाहिजेत, आपली शक्ती वाढली पाहिजे. आपण लढू पण आत्महत्या करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कधीच आत्महत्या करत नव्हते”, असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठा समाजातील तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे.