पंजाबातल्या फाझिल्का या गावात इंग्रजीत एमए करीत असलेल्या आणि हुशार म्हणून लोकांकडून कौतुक होणाऱ्या एखाद्या तरुणीला प्राध्यापक वगैरे व्हावंसं वाटलं असतं, नाहीतर लग्न करून चारचौघींसारखं आयुष्य शांतपणे जगायलाही आवडलं असतं. पण घरात वडिलांमुळे संरक्षण क्षेत्राचा वारसा असलेल्या आणि किरण बेदींची झेप पाहून भारावलेल्या मीरा चढ्ढा या तरुणीचा इरादा पक्का होता तो पोलीस सेवेत जाऊन लोकसेवा करण्याचा! स्वप्न बरेजण पाहतात पण हे स्वप्न प्रत्यक्षात आणलेल्या मीरा चढ्ढा अर्थात महाराष्ट्र पोलीस दलात आपला वेगळाच दरारा जपलेल्या मीरा बोरवणकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी पुणेकरांना उद्या, बुधवारी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमामुळे मिळणार आहे.
महिला या पुरुषांपेक्षा अधिक सहनशील आणि अधिक सक्षम असतात, त्यांनी केवळ आपल्या न्यूनगंडाला तिलांजली देऊन नवी आव्हाने पेलली पाहिजेत, असं मत एका मुलाखतीत त्यांनी मांडलं होतं. त्यामुळे त्यांच्याशी गप्पांची ही संधी म्हणजे तरुणाईला नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा देईल, यात शंका नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या यशस्वी स्त्रियांना व्हिवा लाऊंजमध्ये निमंत्रित करण्यात येते. या वेळी प्रथमच व्हिवा लाऊंज पुण्यात होणार आहे. त्यानिमित्त पुण्याच्या आयुक्तपदी धडाडीने काम केलेल्या मीरा बोरवणकरांशी पुन्हा संवाद साधण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे.  बोरवणकर सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, तुरुंग प्रशासन या पदावर आहेत. महिला पोलीस अधिकारी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही, तर करारी, धीट आणि कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
कधी : आज, २० नोव्हेंबर.
कुठे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.
वेळ : दुपारी ३.३० वा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा