प्रति,
डॉ. दीपक सावंत,
आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री औरंगाबाद.
जय महाराष्ट्र साहेब, मी मूळ धाराशीवचा (उस्मानाबाद) सध्या संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) राहतोय. तुम्हाला कळावं म्हणून शिवसेनेच्या भाषेत बोललो. ती कळली असेल असं समजून पुढं आता संविधानिक भाषेचा वापर करतो. तसं पाहिलं तर भाषेपेक्षा भावना महत्वाची. प्रश्न महत्वाचा. त्याची तुम्हाला जाणीव व्हावी म्हणून हा सारा पत्र प्रपंच करतोय…

तुमचं माहीत नाही. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना थेट बोललेलं आवडत म्हणून जरा थेटच बोलतो. रामदास भाईच्या जागेवर तुम्ही औरंगाबादच पालकत्व स्वीकारलत. त्यावेळी तुमच्याच पक्षात ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती होती. त्यात खुशी झालेल्यांनी ‘आप आये बहार आये’.असं म्हणत भल्या पहाटे तुमचं जंगी स्वागत केलं. आता त्या स्वागतात तुमच्यावरच्या प्रेमापेक्षा रामदास कदमांची उचलबांगडी झाली याचा आनंद जास्त होता का ? माहीत नाही. कारण तुम्हाला पुष्पमाळा घातल्या जात होत्या तेंव्हा कदम यांच्याकडे कुणी चुकून पाहिलं देखील नाही. असो, तुमच्या पक्षाचं राजकारण तुमच्या पक्षात.मात्र सध्या शहराची जी अवस्था झालीय. ते पाहून दुःख होतं. तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मात्र तरीही…

पर्यटन राजधानी असलेलं औरंगाबाद सध्या कचऱ्याची राजधानी झालंय. शाळा, दवाखाने, मंदीर सगळीकडे कचराकोंडी झालीय. महिना झालं रस्त्यावरचे कचऱ्याचे ढीग अजून तसेच आहेत. ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता. त्या जयभवानी नगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीशी देखील उकीरडा झालाय. रस्त्यानं चालताना माणसांना नाक दाबून चालावं लागतंय. नाक दाबून बुक्क्यांचा मार सुरू असताना कचराप्रश्नावर फक्त वांझोट्या चर्चा सुरू आहेत. आता त्या चर्चेनं बाळसं धरलय. त्यातूनचं जमिनीचं पोट फाडून त्यात सरसकट कचरा पुरला जातोय. सदैव आपल्या पोटाची चिंता करणाऱ्यांना या शहराच्या पोटाचं काय होईल याचं काहीही देणंघेणं नाही. शहराच्या अंगाला खड्डे पडलेत. आठ-आठ दिवस घसा कोरडा पडतोय.नसांची गटार तुंबलीत. त्यामध्ये भर म्हणून महिनाभरापासून कचऱ्याची जखम भळभळतेय. आता तिचा उग्र वास सुटलाय. त्यामुळे शहराचा श्वास कोंडल्यानं जगणं असह्य झालय.

मुख्यमंत्रांच्या सांगण्यावरून तुम्ही महिनाभरापूर्वी नारेगाव इथं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. स्वतः डॉक्टर असल्यानं हा आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. याची तुम्हाला तात्काळ जाणीव देखील झाली. काळजीपूर्वक विचार केला जाईल असं तुम्ही सांगितल्यान मोठा दिलासा वाटला होता. पण गोड-गोड बोलून तुम्ही गेलात. आज महिना झालं कचराकोंडी झालीय तुम्ही फिरकला ही नाहीत. कामाचा जरा जास्त लोड असेल असं आम्ही समजून घेतलं. मात्र तुम्ही जे खातं सांभाळता त्या आरोग्य विभागावर कचऱ्यामुळ काय परिणाम झाला का याचा साधा आढावा देखील घेतला नाहीत. औरंगाबदच पालकत्व घेऊन ही पोरकी वागणूक कशामुळे. मंत्री झालात आणि विसरलात काय, तुम्ही आरोग्यमंत्री व्हावं आणि औरंगाबादला यावं म्हणून खासदार चंद्रकांत खैरेंनी तुमच्याच घरच्या गणपतीला नवस केला होता. तुमच्या घरचा गणपती त्यांना पावला आणि तुम्ही ‘नवसाचे’ मंत्री झालात. तुमच्या समोर खैरे साहेबांनी सांगितलेल्या किमान या नवसाची तरी जाणीव ठेवा. साहेब शहराची कचराकोंडी सोडवण्यासाठी यंत्रणेला कामी लावा.

तुम्हाला जरा राग येईल. पण तुम्ही उस्मानाबादचे पालकमंत्री असताना शासकीय आरोग्य विभागाचे धिंडवडे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले होते. तुमच्या आरोग्य खात्याच्या उदासीनतेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात सलाईन दोरीला टांगावे लागले होते. तसा औरंगाबादचा कचराप्रश्न जुना आहे. मात्र सध्या शहर सलाईनवर आहे. त्यामुळे थोडं जातीनं लक्ष घाला. साहेब फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडाफडकवायला शहरात येऊन ‘झेंडामंत्री’ होऊ नका…

-आप्पासाहेब शेळके