अहिल्यानगर: शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, विज्ञान विषयक संकल्पना दृढ व्हाव्यात, कुतूहल व शोधनवृत्ती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने, प्राथमिक शाळांतून ‘ओपन सायन्स पार्क’ विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा लाभ लगतच्या शाळातील विद्यार्थी घेऊ लागले आहेत.आत्तापर्यंत संवत्सर (ता. कोपरगाव), सारोळा कासार (ता. अहिल्यानगर), पानोली (ता. पारनेर), व काष्टी (ता. श्रीगोंदे) येथे ‘ओपन सायन्स पार्क’ विकसित करण्यात आल्या आहेत तर कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील काम प्रगतीपथावर आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गेल्या अर्थसंकल्पात ही संकल्पना जाहीर केली होती. केवळ जिल्हा परिषदेच्याच नाहीतर जवळच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही या ‘ओपन सायन्स पार्क’चा लाभ होणार आहे. ‘ओपन सायन्स पार्क’ विकसित केल्यामुळे आनंददायी शिक्षणातून विज्ञान संकल्पना विद्यार्थ्यात रुजण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन शाळेची गोडी वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढीस मदत होत असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी सांगितले.
ओपन सायन्स पार्कमध्ये एकूण २२ विज्ञान विषयक माहिती फलक व उपकरणे स्थापित करण्यात आली आहेत. १० लाखापर्यंतची उपकरणे व साहित्य जिल्हा परिषदेमार्फत पुरवले जाता तर ग्रामपंचायतीने त्यासाठी कुंपणाची १० लाखापर्यंतची तरतूद करणे आवश्यक आहे. पुढील वर्षीही ५ शाळातून ‘ओपन सायन्स पार्क’ विकसित करणाऱ्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.शाळेतील ‘ओपन सायन्स पार्क’ मला खूप आवडले. यामध्ये विज्ञानामधील रॉकेट, सूर्यमाला, आकाशगंगा, विविध शास्त्रज्ञांची ओळख, पवनचक्की आदी प्रत्यक्ष पाहायला मिळाले. त्यामुळे मी शाळेत नियमित येत आहे. -समृद्धी अमोल चौधरी, इयत्ता ४ थी, सारोळा कासार शाळा. संवत्सर शाळेत ‘ओपन सायन्स पार्क’मधील साहित्याची उभारणी आकर्षक पद्धतीने केली आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यासह गावातील इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग होत आहे. -नाजमीन एजाज शेख, पालक, संवत्सर, कोपरगाव.