यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी मिळताजुळता असल्याने आपणास तो उपयुक्त ठरला. काम करता करता शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करीत असून अशा विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठ उत्तम पर्याय आहे. आपल्या यशात मुक्त विद्यापीठाचा सिंहाचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या कौस्तुभ दिवेगावकरने व्यक्त केली.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने पुण्यातील विभागीय कार्यालयात दिवेगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
 या वेळी विद्यापीठाचे संस्थात्मक संप्रेषण प्रमुख श्रीनिवास बेलसरे, विभागीय संचालक डॉ. प्रकाश जोशी उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना कौस्तुभ यांनी मुक्त विद्यापीठाच्या अध्ययन साहित्याची प्रशंसा केली. नियमित अभ्यास, वाचनाचा सराव, स्वत: नोट्स काढण्याची सवय आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे या परीक्षेत यश मिळण्यास मदत झाली. आपण बारावी विज्ञान शाखेतील असून मराठी भाषा विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याने, मुक्त विद्यापीठाचा बीए शिक्षणक्रम दर्जेदार असल्याचे जाणवल्यानेच आपण पदवीसाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रसिद्ध होणारे लोकराज्य मासिक मुलाखतीसाठी उपयुक्त ठरल्याची भावनाही कौस्तुभने या वेळी व्यक्त केली.

Story img Loader