मुक्त विद्यापीठाच्या “इंटरअ‍ॅक्टीव्ह वेब रेडिओ”सेवेचे उद्घाटन
जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असणाऱ्या आणि अंध विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरू शकणाऱ्या “यशवाणी” या “इंटरअ‍ॅक्टीव्ह वेब रेडिओ”च्या माध्यमातून येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जगाचा कानाकोपऱ्यासह अंतराळापर्यंत पोहोचणार आहे, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले.
“इंटरअ‍ॅक्टीव्ह लाइव्ह वेब-रेडिओ” सेवा सुरू करून मुक्त विद्यापीठ देशात अशा प्रकारची सेवा देणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे.  विद्यापीठाच्या प्रशस्त स्टुडिओमध्ये शुक्रवारी या सेवेचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. विशेष म्हणजे, ही सेवा भ्रमणध्वनीवरही देण्याचा प्रयत्न केला जात असून तो लवकरच प्रत्यक्षात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी कॉमनवेल्थ एज्युकेशन मीडिया सेंटर फॉर एशियाचे माजी संचालक डॉ. आर. श्रीधर आणि कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार उपस्थित होते. मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यभर आहे. आता या प्रगत तंत्रज्ञानामुळे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जगभरच नव्हे तर अंतराळापर्यंत पोहोचले असल्याचे जाधव यांनी नमूद केले. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती श्रीधर यांनी दिली. या सेवेमुळे आता अंतराळातून मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येऊ शकेल इतके हे तंत्रज्ञान प्रगत आहे. आम्ही लवकरच या तंत्रज्ञानाव्दारे भ्रमणध्वनीवरही सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या सेवेचा एकाचवेळी हजारो विद्यार्थी लाभ घेऊ शकतील. त्याकरिता वापरलेले संपूर्ण तंत्रज्ञान स्वदेशी असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. कृष्णकुमार यांनी देशातील ४०६ विद्यापीठांमध्ये मुक्त विद्यापीठ हे असे पहिले विद्यापीठ आहे की ज्याद्वारे विद्यार्थ्यांशी दुहेरी संवाद साधता येईल, असे सांगितले. शिक्षण प्रक्रियेत आता वेब रेडिओच्या किफायतशीर तंत्रज्ञानाचा आग्रही वापर करायला हवा. रेडिओ हे माध्यम एफएम सेवेमुळे युवा वर्गापासून ते शेतकऱ्यांपर्यंत लोकप्रिय झाले आहे. लवकरच विद्यापीठाच्या अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड विभागीय केंद्रावरूनही त्या त्या विभागासाठी स्वतंत्र वेब-रेडिओ सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open university university blind student student worldwide student interactive live web radio yashwantrao chavan open university
Show comments