लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : भाजपचे ऑपरेशन कमळ म्हणजे आमदार खरेदी-विक्रीचा उद्योग आहे. कर्नाटकात भाजपला आम्ही मुळासकट फेकून दिले. आता देशातून व महाराष्ट्रातूनही भाजपला फेकून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी रविवारी सांगलीत केले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा सांगली येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती. या मेळाव्यास जत, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळसह सांगलीतील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिध्दरामय्या म्हणाले, कर्नाटकात भाजप कधीच जनतेचा आशीर्वाद घेऊन निवडून आले नाही. केवळ ऑपरेशन कमळ आणि आमदार खरेदी करून सत्तेवर आले. खोके देऊन आमदार खरेदी करण्याचा उद्योग भाजप करीत आला आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार भ्रष्ट असून देशात अथवा राज्यातील भाजपा सरकार उखडून टाकले पाहिजे. कोणतेच विकासाचे धोरण नाही. फक्त लाच घेणे आणि देणे हाच त्यांचा एककलमी उद्योग आहे. प्रत्येक कुटुंबाला मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला, मात्र, केंद्राने अन्न महामंडळाना कर्नाटकसाठी तांदूळ देऊ नये अशी ताकीद दिली. हे राजकारण भाजप करीत आहे. यामुळे केंद्रातील सरकार गोरगरीब जनतेच्या विरोधात आहे. जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावासाठी तुबची बबलेश्वरचे पाणी देण्याबाबत चर्चा करण्याची कर्नाटकची तयारी आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष आ.पटोले म्हणाले, आदिपुरूष चित्रपटामध्ये बजरंगबलीचा अवमान करण्याचे काम केले आहे. आता भाजपसोबत बजरंगबलीही नाही, श्रीरामही नाही. राज्यातील असंवैधानिक सरकारने वारकर्यावर लाठीमार करून असंवसेवदनशीलता दर्शवली आहे. पंढरपूरमध्ये जनतेच्या पैशातून लावण्यात आलेल्या जाहिरातीमधून पांडूरंगाचा अवमान करण्याचे काम या सरकारकडून होत आहे. हा अवमान काँग्रेस खपवून घेणार नाही. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सिध्दरामय्या यांची आजची सभा म्हणजे महाराष्ट्रातील परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगितले, तर माजी मंत्री थोरात यांनी राज्यातील सरकारकडून केवळ घोषणाबाजी सुरू असून प्रत्यक्षात काम कोणतेच होत नसल्याचा आरोप केला. लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याने मोदी सरकारकडून राज्य घटनेचे काय केले जाणार याची भीती वाटत असल्याचेही ते म्हणाले.