विधान परिषदेत चर्चा थांबवून विशेष तपास यंत्रणेची (एसआयटी) घोषणा करावी या मागणीसाठी विरोधी पक्षाने गोंधळ घातल्याने सभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर नियम २८९ अंतर्गत विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावांतर्गत स्थगन प्रस्ताव मांडला.
राज्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला असून श्वेतपत्रिकेतील सिंचन क्षेत्रवाढीचा आकडा खोटा असून केवळ ०.१ टक्क्याने वाढ झाली आहे. या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, त्यासाठी एसआयटीची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्यावर काँग्रेसचे माणिकराव ठाकरेंनी आधी चर्चा करण्यावर जोर दिला मात्र, विरोधी पक्षाने तो अमान्य करीत एसआयटीची घोषणा करण्याचा मुद्दा लावून धरला.
वारंवार विरोधी बाकांवरून एसआयटीच्या मागणीवर जोर देण्यात आला मात्र, सभापतींकडून काहीही अनुकूल उत्तर येत नसल्याने सभापतींसमोर मोकळ्या जागेवर जाऊन विरोधकांनी ‘चर्चा नंतर, एसआयटी आधी’ अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. तसेच खाऊन खाऊन खाणार किती शेतकऱ्यांना मारणार किती?  अशा घोषणा देत कामकाजात व्यत्यय आणला. सभापतींनी २८९ वर नंतर निर्णय देऊ, असे सांगून आज दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा