‘ठग्स ऑफ महाराष्ट्र’ या विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधक मुद्दे नसल्याने ‘फिल्मी टायटल्स’चा वापर करत असून यातून त्यांचा पोरकटपणा दिसून येतो, असे ते म्हणाले. त्यांनी ‘ठग्स ऑफ महाराष्ट्र’ म्हटले आहे. मी तर त्यांना गँग्स ऑफ वासेपूर यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणेन, असा टोला लगावत विरोधकांनी थोडे गंभीर होण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
विरोधकांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्ने त्यांच्याच काळातील आहेत. तेच त्याची उत्तरे देऊ शकतात. ते म्हणाले की, राज्यात यंदा फक्त ७४ टक्के पाऊस झाला. सर्व निकष तपासून १५१ तालुके पूर्ण दुष्काळी जाहीर केले आहेत.
महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ३१ ऑक्टोबरच्या आत केंद्राच्या निकषात बसणारा दुष्काळ जाहीर केला. केंद्राला त्वरीत साडेसात हजार कोटींचा प्रस्तावही पाठवला. महाराष्ट्राच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी वेळात आणि तत्परतेने कार्यवाही झाली. आवश्यक तिथे टँकर सुरु केले. उपाय योजना अजूनही केल्या जात आहेत.
विरोधकांनी दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा मोलाच्या सूचना द्याव्यात. शेतकऱ्यांना धीर देता येईल, असे वक्तव्ये करावे. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. आम्ही कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची नावानिशी यादी जाहीर केली. विरोधकांनी त्यांच्या काळातील कर्जमाफीची यादी जाहीर करावी, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
उद्योगाबाबत चुकीची आकडेवारी देऊन आपल्याच राज्याची बदनामी करण्यात यांना कसला आनंद आहे माहीत नाही. केंद्र सरकार किंवा आरबीआयच्या यादीतही उद्योगामध्ये राज्य सरकार आघाडीवर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.